• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

सातवीपर्यंत थांबलेले शिक्षण ते बी.ए., एम. ए. इतिहासात प्रथम श्रेणीत यश

ByMirror

Feb 10, 2026
प्रतिकूलतेवर मात करत शिक्षणाची शिखरे सर

उषा शिंदे-जगधने यांची प्रेरणादायी वाटचाल; न्यू आर्ट्‌स कॉलेज शेवगाव येथे सन्मान


प्रतिकूलतेवर मात करत शिक्षणाची शिखरे सर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणासाठी निर्माण झालेल्या अनेक अडचणी, सामाजिक बंधने आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उषा अशोक शिंदे-जगधने यांनी बी.ए., एम.ए. (इतिहास विभाग) मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू आर्ट्‌स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, शेवगाव येथे विशेष सन्मान करण्यात आला.


या सन्मान सोहळ्यास आबासाहेब काकडे विद्यालयातील अशोक तनमर, गायकवाड सर, पुजारी मॅडम, तसेच न्यू आर्ट्‌स कॉलेज शेवगावचे प्रा. डॉ. मिरे, प्रा. नवथर सर, प्रा. डॉ. शेळके सर, प्रा. वैद्य सर, प्रा. शेंडगे, प्रा. कसबे आदी मान्यवर प्राध्यापक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी उषा शिंदे यांच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


उषा अशोक शिंदे (जगधने) यांचे शिक्षण लग्नाच्या वेळी केवळ सातवीपर्यंत झाले होते. परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मात्र लग्नानंतर त्यांचे पती अशोक शिंदे, जे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, त्यांनी महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन पत्नीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. या प्रेरणेला सकारात्मक प्रतिसाद देत उषा शिंदे यांनी 2018 पासून पुन्हा शिक्षणाची सुरुवात केली.


त्यांनी आबासाहेब काकडे विद्यालयातून 17 नंबरचा फॉर्म भरून दहावीत प्रवेश घेतला. त्यानंतर कोणतीही अडचण शिक्षणाच्या आड येऊ न देता त्यांनी सातत्य, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर दहावी, बारावी आणि पुढे बी.ए., एम. ए. (इतिहास) हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. विशेष म्हणजे बी.ए. परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणी मिळवून यशाची मोहोर उमटवली.


या यशामुळे उषा शिंदे यांनी केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर इतर महिलांसाठी शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा पुढील काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक विचारांवर संशोधन करण्याचा तसेच कायद्याचे (लॉ) शिक्षण घेण्याचा मानस आहे. यासोबतच त्यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी समाजजागृतीचे कार्य देखील सुरू केले आहे. या संपूर्ण शैक्षणिक व सामाजिक प्रवासात त्यांना त्यांचे पती अशोक शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *