सामाजिक कार्यकर्ते संकेत कुलट यांनी स्वखर्चातून केले पूलाचे सुशोभीकरण
सार्वजनिक स्वच्छता व विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा -आमदार जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुरुडगाव येथे सीना नदीवरील दोन ठिकाणच्या पुलांचे सुशोभीकरण करून साकारलेल्या ‘राम सेतू पूल’ व ‘राम झुला’ चे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले. सामाजिक कार्यकर्ते संकेत कुलट यांनी स्वखर्चातून हे काम पूर्ण गावाच्या विकासाला व सुशोभीकरणाला चालना दिली आहे.
या उद्घाटनप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नवनिर्वाचित नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, अमोल येवले, मयूर (बाली) बांगरे, सुमित लोंढे, संजय चोपडा, जालिंदर कोतकर, अवधूत फुलसौंदर, संकेत कुलट, सुभाष कुलट, विवेक (मुन्ना) कुलट आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रारंभी फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार जगताप यांच्यासह पाहुण्यांचे गावात स्वागत करुन महिलांनी औक्षण केले. यावेळी राम सेतू पूलावर माझं गाव माझा अभिमान या फलकाचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविकात जालिंदर कुलट यांनी सांगितले की, संकेत कुलट यांनी स्वखर्चाने सीना नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊनही गावाला पुराचा फटका बसला नाही. याशिवाय त्यांनी 700 विद्यार्थ्यांना सायकल वाटप, अमरधाम विकास, विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. भिंगारनाला ते बुरुडगाव रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणीही यावेळी आमदार जगताप यांच्याकडे त्यांनी केली.
संकेत कुलट यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करताना सांगितले की, आमदार संग्राम जगताप हे सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेतृत्व आहे. ते जो निर्णय घेतील, त्यांच्या पाठीशी कार्यकर्ते आणि बुरुडगाव एकमुखाने उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बुरुडगावात झालेल्या राम सेतू पूल व राम झुलाचे सुशोभीकरण गावाच्या विकासाला चालना देणारे आहे. विकासात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. राष्ट्र संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेसाठी मोठे कार्य केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. या कार्यात महापुरुषांची सातत्य ठेवले. स्व. आर.आर. पाटील यांनी ग्रामविकास मंत्री असताना गावे हागणदारी मुक्ती होण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसाठी स्वत:हातात झाडू घेऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत आहे. इंदोर शहर स्वच्छतेच्या बाबत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये तेथील नागरिकांचे महत्त्वाचे योगदान आहे. लोकांनी ठरविले तर गाव आणि शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. बुरुडगावचा विकास साधला जात असताना पुढची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. शहर कचरा मुक्त होण्यासाठी नागरिकांचा संकल्प घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
शहरात डांबरी रस्ते पावसामुळे जास्त काळ टिकत नव्हते, म्हणून मोठ्या प्रमाणात निधी आणून सिमेंटचे रस्ते केले जात आहे. शहराच्या इतिहासात एवढा निधी यापूर्वी आला नाही. सामाजिक कामाला विरोध होत असते, मात्र न थांबता पुढे जायचे असते. समाजाचा विरोध पत्करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी क्रांती घडवली. विकास व हिंदुत्व या मुद्द्यांवर महापालिका निवडणुकीत यश मिळाल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.
गणेश भोसले म्हणाले की, युवकांच्या पुढाकाराने गावाचा कायापालट होत आहे. सोशल मीडियावर बुरुडगाव परिसरातील रिल्स आणि फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कुलट यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून इच्छाशक्ती असेल तर विकास साधता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी कुलट यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना सांगितले की, बुरुडगावच्या प्रत्येक विकासकामात त्यांचे योगदान आहे. आमदार संग्राम जगताप यांनी शहरात कोट्यवधींचा निधी आणून रस्ते काँक्रिटीकरण, 30 कोटींचे रुग्णालय उभारले. हिंदुत्वाचा वारसा पुढे नेत जगताप कार्यरत असून लवकरच ते कॅबिनेट मंत्री होतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रकाश भागानगरे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. विकास आणि धर्मकार्याला गती मिळाली असून विकास व धर्माच्या रथाचे सारथी आमदार जगताप असल्याचे ते म्हणाले.
सीना नदीवरील पुलाचे खोलीकरण व रुंदीकरणानंतर सामाजिक कार्यकर्ते संकेत कुलट यांनी राम सेतू पूल व राम झुला साकारला आहे. या पुलावर तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी हा परिसर अत्यंत मनमोहक दिसतो. तरुणाईमध्ये या ठिकाणाची विशेष क्रेझ निर्माण झाली असून रिल्स व फोटोशूटसाठी अनेक जण येथे भेट देत आहेत. सुंदर आणि भव्य पुलावर ग्रामस्थही सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
