लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित; सिंचन कर्मचाऱ्यांना दिलासा
अहिल्यानगर जिल्ह्यातही प्रश्न प्रलंबित; न सुटल्यास आंदोलन -नारायणराव तमनर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित प्रवास भत्ता देयके व थकित वेतन तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर राज्यव्यापी “थाळीनाद आंदोलन” करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातही प्रवास भत्ता व वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून, तो तातडीने न सुटल्यास अहिल्यानगर पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नारायणराव तमनर यांनी दिला आहे.
हे आंदोलन संघटनेचे राज्यसरचिटणीस गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या आंदोलनाला राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संघटनेने यापूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी स्वरूपात पाठपुरावा करूनही प्रवास भत्ता देयके वेळेवर अदा न झाल्याने तसेच काही कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित राहिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून या संवर्गातील कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच कालवा चौकीदार (वर्ग3) पदावरील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविला.
आंदोलनाची तीव्रता वाढताच जलसंपदा विभागाकडून मध्यस्थी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सुरुवातीला विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तोंडी आश्वासन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संघटनेचे राज्यसरचिटणीस गणेश सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांसमोर विषय मांडत लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली. अखेर सर्वानुमते लेखी आश्वासन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती शहापुरे यांनी संघटनेला लेखी आश्वासन दिले. यानंतर सोनवणे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना उद्देशून थाळीनाद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचे आवाहन केले. लेखी आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन यशस्वी झाल्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये अनिल पाका, विशाल सोनवणे, बाबासाहेब वाघमारे, श्रीमती रूपाली सपाटे, अश्विनी कानडकर, शिल्पा हुलेकर, अर्चना तगरे, एस. आर. बंगरे, के. एस. देशमुख, राहुल सुरवसे, एस. जी. केदारे, आर. एन. गंगावणे, सुरज राजपूत, नवनाथ हरक, पवन गाडेकर, गणेश पंचोले, श्रीमती पठारे, वाकळे, गोसावी, जाधव, मोरे, मुंडे, घुगे, राऊत, सोनवणे, गायकवाड, श्री वैभव उसरे, कृष्णा लगाने, संजय भगत, संजय दाभाडे, बहुरे, साळुंखे, कोलते, पिंपळे, पाटील, खान, झोनवाल, निकम, हजारे, डुलगाज, कळस्कर, सपाटे, पवार, वाघ आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
