• Tue. Dec 30th, 2025

सुपर स्पेशालिटी इंम्पल्स हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत

ByMirror

Dec 28, 2025

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इंम्पल्स हॉस्पिटलचे लोकार्पण सोहळा उत्साहात

अहिल्यानगर –
वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत समर्पित भावनेने काम करणारे डॉ. संदीप गाडे व त्यांच्या सहकार्याने इंम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने एक आरोग्य भवनच उभे केले आहे. या हॉस्पिटल मधून रुग्णांना सर्व प्रकारची रुग्णसेवा मिळणार आहे. त्याचबरोबर सर्व शासकीय योजनांचाही लाभ होणार आहे. सुपर स्पेशालिटी इंम्पल्स हॉस्पिटल म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याची भूषणवाह वास्तू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सुपर स्पेशलिटी इंम्पल्स हॉस्पिटलचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी महसूलमंत्री आमदार सुरेश धस, आमदार संग्राम जगताप,
भगवान बाबा गडाचे महंत हभप नामदेव शास्त्री महाराज, मदन महाराज संस्थानचे महंत हभप बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते झाले.


यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, आयुक्त यशवंत डांगे, माजी कृषी आयुक्त चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, इंम्पल्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप गाडे, डॉ. ज्योती गाडे, डॉ. संदीप गाडे यांचे वडील नवनाथ गाडे, आई फुलाबाई गाडे, डॉ. ज्योती गाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आज मन की बात कार्यक्रमांमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठली औषधी घेऊ, नये असा विषय मांडला.


इंम्पल्स हॉस्पिटलचे उद्घाटन आणि पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमांमध्ये आरोग्याचा विषयक मांडणे हा योगायोगच म्हणावा लागेल.


डॉ. संदीप गाडे यांनी अत्यंत साधारण परिस्थितीमधून वाटचाल करीत शिक्षण पूर्ण केले. कार्डिओलाजीचे शिक्षण घेताना देशांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. समर्पित भावनेने काम करणारे डॉ. संदीप गाडे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हॉस्पिटलची उभारणी केली. ही आपल्या अहिल्यानगरच्या दृष्टीने अत्यंत भूषणवाह बाब आहे. आता एआय तंत्रज्ञानामुळे डॉक्टर लोकांसमोर एक आव्हानच आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला फार महत्त्व आले आहे.
आमदार सुरेश धस यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यासंदर्भात लगेच तात्काळ सूचना देऊन बैठक लावण्यात येईल आणि संबंधित हॉस्पिटलला सूचना देण्यात येतील.

रुग्णसेवेची क्रांती म्हणजे इंम्पल्स हॉस्पिटल

सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, इंम्पल्स हॉस्पिटलच्या निर्मिती मागे डॉ. संदीप गाडे यांचे अपार कष्ट आणि मेहनत आहे. हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी अनेक रुग्णांची सकारात्मक आशीर्वाद त्यांना लाभले. समाजसेवेच्या भूमिकेतून एका छोट्या कुटुंबातून पुढे आल्यानंतर रुग्णांची सेवा करणे आणि त्यांना पुनर्जन्म देणे, त्यांना हॉस्पिटलमधून बरे करून पाठवणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. रुग्णांप्रती निष्ठा असल्यानेच आज इंम्पल्स हॉस्पिटलचे भव्य वास्तूमध्ये स्थलांतर होत आहे.


इंम्पल्स हॉस्पिटलची टीम अत्यंत चांगली आणि कर्तव्यदक्ष आहे. इंम्पल्स हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊन पुन्हा घरी जाणे आणि त्याने स्वतः इतरांना हॉस्पिटलची महती सांगणे हीच खरी इंम्पल्स हॉस्पिटलची क्रांती आहे. डॉ. संदीप गाडे यांच्या माध्यमातून आपल्या शहरांमध्ये अतिशय दर्जेदार प्राविण्य असलेला वैद्यकीय तज्ञ आपल्याला लाभला आहे, हा आपल्यासाठी सुवर्णक्षण आहे.

डॉ. संदीप गाडे भविष्यातील डॉ. नीतू मांडके

आमदार सुरेश धस म्हणाले की, डॉ. संदीप गाडे यांची परिस्थिती पाहिली तर वडील शिक्षक व आई गृहिणी आहे. अतिशय सामान्य कुटुंबांमधून खडतर प्रवास करीत गाडे सरांनी त्यांच्या मुलांना शिक्षण दिले. आज या यश शिखरापर्यंत आणून पोहोचविले. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही जरी बीड जिल्ह्यातील असलो तरीही अहिल्यानगर जिल्ह्याशी आमचा जवळचा स्नेह आहे.


डॉ. संदीप गाडे हे आमच्या कुटुंबातीलच असल्याने हृदयविकारासंदर्भात कोणाची तक्रार असले तर आम्ही हक्काने डॉ. संदीप गाडे यांच्याकडे जाण्यास सांगतो. त्याचा सगळा फायदा कोरोना काळात झाला. कारण आज समोर बसलेली अशी काही माणसे आहेत की ती आज डॉ. नसते तर आज आपल्याला दिसली नसती. कोरोना काळापासूनच सर्वाधिक जास्त विश्वास डॉ. गाडे यांच्यावर बसला. देशांमध्ये पूर्वी सर्व राजकीय नेते परदेशात जाऊन ओपन हार्ट सर्जरी करत होते. त्यात एकमेव बाळासाहेब ठाकरे असे नेते होते की त्यांनी स्वतःची ओपन हार्ट सर्जरी महाराष्ट्रात केली. ती सर्जरी करणारे डॉ. नीतू मांडके होते. त्यामुळे माझे एक स्वप्न आहे की, डॉ. संदीप गाडे हे सुद्धा एक दिवस या राज्याचे नीतू मांडके होऊ शकतात. इतकी गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे.


हार्टचा काही प्रॉब्लेम होण्याच्या अगोदर शिबिरे घेण्याची आवश्यकता आहे. काही पेशंट अगदी चालता बोलता जात आहेत. त्यामुळे आता हृदयरोग ओळखण्यासाठी शिबिरे घेणे गरजेचे आहे.

अरुणकाका जगताप आणि आ. शिवाजी कर्डिले यांची आठवण
आष्टी तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी अहिल्यानगरमध्ये येत असतात. तेव्हा बिल कमी करण्यासह अन्य कामासंदर्भात आम्हाला एक मोठा आधार होता ते म्हणजे अरुणकाका. काकांना फोन केला की त्या पेशंटचे बिल कमी होत होते. अरुण काका एक मोठे व्यासपीठच होते. अरुणकाका नंतर आम्ही आ. शिवाजी कर्डिले यांना संपर्क करत होतो. दुर्दैवाने ते दोघेही आता इथे नाही.

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑनलाईन प्रक्रियेत काही हॉस्पिटल सहकार्य करीत नाहीत तर, काही हॉस्पिटलचे चांगले सहकार्य आहे. त्यामुळे त्यासंदर्भात पालकमंत्री विखे पाटील यांनी तात्काळ बैठक घेऊन तो प्रश्नमार्गी लावावा.

इंम्पल्स हॉस्पिटलमुळे अहिल्यानगरच्या वैभवात भर

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, इंम्पल्स हॉस्पिटलचा रूपाने आपल्या अहिल्यानगरच्या आरोग्य सेवेमध्ये एक वैभवशाली वास्तु उभी राहली आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी आरोग्याच्या समस्येबाबत अहिल्यानगरवासियांना पुण्या, मुंबईला जावे लागत होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत दर्जेदार वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रॅक्टिस करून नगरमध्ये रुग्ण सेवा करीत आहे. त्यापैकीच डॉ. संदीप गाडे हेही नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. डॉ. संदीप गाडे यांनी आज एक अत्याधुनिक स्वरूपाचे वैभवशाली हॉस्पिटल नगर शहरात उभे केले. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्याही वैभवात भर पडली आहे.

नामदेव महाराज शास्त्री म्हणाले की, काही माणसं स्वभावाने खूप गोड असतात. हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस हा अर्धा औषधाने आणि अर्धा बोलण्याने बरा होत असतो हे सगळे गुण डॉ. संदीप गाडे यांच्यामध्ये आहेत. इंम्पल्स हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे सर्व कर्मचारी विनम्र आहेत. त्यांच्या हाताला यश येवो, अशी भगवान बाबा चरणी प्रार्थना.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, इंम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने डॉ. संदीप गाडे यांनी आरोग्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी नगरकरांना आरोग्यासाठी पुण्याच्या दिशेने जावे लागत होते. परंतु, आता पुण्या इतकीच दर्जेदार आरोग्य सुविधा नगरमध्ये मिळणार आहे. डॉ. संदीप गाडे यांनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

प्रास्ताविक करताना डॉ. संदीप गाडे म्हणाले की, हॉस्पिटलच्या उभारणीसाठी कुटुंबीयांसह सहकारी मित्र परिवाराने मोलाचे योगदान दिले. गेल्या बारा वर्षांमध्ये 16 हजार हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या. समर्पित भावनेने रुग्णसेवा केली आणि त्यातूनच आज एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात यश मिळाले. या यशामध्ये प्रत्येक हितचिंतकाचा वाटा आहे.

पाहुण्यांचा परिचय डॉ. बाबा शिंदे यांनी करून दिला तर, शेवटी डॉ. महेश घुगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *