जुन्या वादातून जीवे मारण्याची धमकी
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील सनफार्मा चौक परिसरात भरदिवसा थरारक प्रकार घडत सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्यावर रिव्हॉल्वर व कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी चिरंजीव दत्तात्रय गाढवे (रा. बोल्हेगाव फाटा, एमआयडीसी) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. गलांडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश गलांडे यांचे आरोपी चिरंजीव गाढवे यांच्याशी पूर्वीपासून ओळख असून जुन्या वादातून त्यांच्यात तणाव होता. शनिवारी सकाळी योगेश गलांडे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून (एम.एच. 16 बी.वाय. 0009) घरातून गजानन कॉलनी, नवनागापूर येथील स्वराज्य कामगार संघटनेच्या कार्यालयाकडे निघाले होते. वाहन चालवित असताना त्यांचा पुतण्या वैष्णव गणेश गलांडे हा चालक होता.
सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास सनफार्मा चौक येथे समोरून एक निळ्या रंगाची, विना नंबरची बलेनो कार आडवी आली. त्या कारमधून चार इसम उतरले. त्यापैकी दोघांच्या हातात कोयते होते. त्यांनी गलांडे यांच्या वाहनाला चारही बाजूंनी घेराव घातला. दरम्यान, बलेनो कारच्या पुढील सीटवर बसलेला आरोपी चिरंजीव गाढवे याने हातातील रिव्हॉल्वर दाखवत योगेश गलांडे यांना “तू फार माजलाय, तुला आज जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपीने आपल्या साथीदारांना “आज यांना सोडायचे नाही,” असे सांगितले. त्यावर आरोपींच्या साथीदारांनी कोयत्याने योगेश गलांडे व वैष्णव गलांडे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत वैष्णव गलांडे यांनी वाहन मागे घेतले. तरीही कोयत्याचे वार वाहनाच्या समोरील काच व बोनेटवर झाले. तसेच वाहनाच्या पाठीमागील काचेवरही कोयत्याचा वार होऊन मोठे नुकसान झाले.
हल्लेखोरांनी पुन्हा वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने प्रसंग ओळखून वाहन वेगात काढत जीव वाचवला. तेथून निघून जात असताना आरोपी चिरंजीव गाढवे याने “आज वाचलास, पुन्हा माझ्या हाती लागलास तर तुला जिवे ठार मारीन,” अशी पुन्हा धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या थरारानंतर योगेश गलांडे व त्यांचे पुतणे थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या फिर्यादीवरून चिरंजीव दत्तात्रय गाढवे व त्याच्या चार अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
