गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक भौतिक सुविधा व स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय यशाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे केडगाव येथील श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयास गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक भौतिक सुविधा, स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय यश, इंटरक्टिव्हबोर्ड द्वारे अध्यापन, शासकीय क्रीडा स्पर्धा यश, विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, एसएससी व एचएससी उत्कृष्ट निकालाची परंपरा इत्यादी सर्व बाबींची विद्यालयाने पूर्तता केल्याने विद्यालयास आय.एस.ओ. 9001 : 2015 हे आंतरराष्ट्रीय मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे.
शाळेला मिळालेल्या आय.एस.ओ. मानांकनाचे अनावरण आदर्श गाव संकल्पचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार तसेच रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव ऑडिटर डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे निमित्त होते विद्यालयाच्या स्नेहतरंग या वार्षिक विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे. या कार्यक्रमामध्ये श्री अंबिका विद्यालयाच्या एसएससी मार्च 2006-07 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या कर्मवीर विचारमंच स्टेजचे बांधकाम देणगीस्वरूपात पूर्ण करून दिले. याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या हस्ते माजी विद्यार्थी विनायक शेवाळकर, अमोल गावडे, अविनाश लाळगे विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव ऑडिटर डॉ. राजेंद्र मोरे यांनी विद्यालयाच्या गुणवत्तेबाबत सर्वांचे कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात पद्मश्री पोपटराव पवार आजच्या तरुण पिढीत सामोरील आव्हाने, मोबाईलचा अतिवापर याविषयी सर्व विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन केले.
विद्यालयास आय.एस.ओ. मानांकन मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांनी विशेष अभिनंदन केले.
विद्यालयास आय.एस.ओ. मानांकन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावणार आहे.
आय.एस.ओ. मानांकन मिळवण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षक संदीप गाडीलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर श्री अंबिका प्राथमिक विद्यालयाच्या बालवाडी, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांच्या महाराष्ट्रीयन परंपरेचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध लोकगीते, समूहगीते सादर केली. लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या गीतांमधून विद्यार्थ्यांनी पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, तालबद्ध सादरीकरण आणि उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, रावसाहेब सातपुते, प्रशांत कोतकर, महेश गुंड, किसन सातपुते, कृष्णाजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूजा गोरे, सीताराम जपकर, संदीप गाडीलकर, सुधीर आघाव, जयश्री बामदळे विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका सातपुते, कांचन ससे व स्वाती औटी यांनी केले.
