• Tue. Dec 30th, 2025

महापालिका निवडणुकीसाठी बसपा शुक्रवारी घेणार इच्छुकांच्या मुलाखती

ByMirror

Dec 25, 2025

अहिल्यानगर महापालिकेसाठी बसपाची तयारी जोरात; चाचपणी करुन सक्षम उमेदवार देण्याचा निर्णय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बहुजन समाज पार्टीने (बसपा) स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करुन सक्षम उमेदवार उभे केले जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.


बसपाच्या वतीने शुक्रवार, दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता तारकपूर येथील हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीस इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


मागील महापालिका निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे चार नगरसेवक निवडून आले होते, ही बाब लक्षात घेता यावेळीही योग्य, तळागाळातील जनतेशी जोडलेले आणि पक्षाच्या विचारधारेशी निष्ठावान उमेदवार देऊन त्यांना विजयी करण्याचा पक्षाचा निर्धार आहे, असे बसपाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रामचंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.


या मुलाखती स्वतः राज्य प्रभारी रामचंद्र जाधव हे घेणार असून, यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये जिल्हाध्यक्ष सुरज कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, जिल्हा प्रभारी सुनिल ओहळ, भाईचारा कमिटीच्या अध्यक्षा उमा शंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे यांच्यासह पक्षाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


महापालिका निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचा प्रभाव वाढविणे, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न महापालिकेच्या माध्यमातून सोडविणे, या उद्देशाने बसपा निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *