• Wed. Dec 31st, 2025

अहिल्यानगरच्या हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीचे दोन खेळाडू महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात

ByMirror

Dec 24, 2025

प्रेम इघे व स्वामिनी बेलेकर यांची राष्ट्रीय व बीसीसीआय स्पर्धेत कामगिरी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहराच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचा तुरा रोवणारी कामगिरी हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीच्या दोन होतकरू आणि प्रतिभावान खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात स्थान मिळवून केली आहे. अकॅडमीतील प्रेम किरण इघे आणि स्वामिनी विजय बेलेकर या दोन खेळाडूंची राज्य संघात निवड झाली आहे.
2 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत केरळमधील तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या 15 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी स्वामिनी विजय बेलेकर हिची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून, तिच्या निवडीमुळे जिल्ह्यातील महिला क्रिकेटला नवी प्रेरणा मिळाली आहे.


स्वामिनी ही डावखुऱ्या हाताची गुणवान फलंदाज व मध्यमगती गोलंदाज असून, तिने यापूर्वी 19 वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या संभाव्य संघात स्थान मिळवून आपल्या कौशल्याची झलक दाखवली होती. ती जळगाव क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करते. जळगाव येथे तिला प्रशिक्षक श्री. सुयश बुरुकुल व तन्वीर अहमद यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे.


प्रेम किरण इघे याची 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत रोहतक (हरियाणा) येथे पार पडलेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली होती. प्रेम हा उजव्या हाताचा कुशल फलंदाज असून, तो एक उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणूनही ओळखला जातो. अंतरशालेय, अंतरविभागीय आणि अंतरराज्य क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत त्याने आपली निवड निश्‍चित केली.


प्रेम इघे आणि स्वामिनी बेलेकर हे दोन्ही खेळाडू अहिल्यानगर येथील हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या निवडीबद्दल आमदार संग्राम जगताप तसेच हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीचे संस्थापक वसीम हुंडेकरी यांनी त्यांचे अभिनंदन करुन दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *