स्वच्छतेतूनच निरोगी आरोग्याची सुरुवात -पै. नाना डोंगरे
विद्यार्थ्यांचा स्वच्छ भारताचा संदेश; संत गाडगे महाराजांच्या विचारांना अभिवादन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे थोर समाजसुधारक व स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी शाळेच्या स्वच्छतेसाठी झाडू भेट दिले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, शिक्षकवृंद मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, शरद भोस, स्वाती इथापे, निकिता रासकर-शिंदे, रेखा जरे-पवार, दिपाली ठाणगे, प्रमोद थिटे, तेजस केदारी तसेच श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, आप्पा कदम आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता अभियान राबवत ‘स्वच्छ भारत’चा संदेश दिला. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवक व नागरिकांनी पुढाकार घेतल्यास स्वच्छतेची चळवळ उभी राहू शकते आणि त्यातूनच स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्वच्छता ही एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची नितांत गरज असून स्वच्छ व सुंदर भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे. परिसर स्वच्छ असल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका कमी होतो आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहते. संत गाडगे महाराजांनी आपल्या कार्यातून स्वच्छतेचे महत्त्व ओळखून समाजाला दिशा दिली असून त्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात श्रेयश शिंदे, शिवराज काळे, यश जपकर, आरोही ठोफ्लबे, अलिझा शेख, साक्षी काळे, आराध्य फलके, कोमल कदम व स्वरा जाधव या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या उपक्रमासाठी नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे तसेच रमेश गाडगे यांनी मार्गदर्शन केले.
