• Wed. Dec 31st, 2025

श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाचा खेळाडू शमवेल वैरागरचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश

ByMirror

Dec 18, 2025

सुवर्ण-रौप्य पदकाची कमाई

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. शमवेल प्रवीण वैरागर याने राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत शमवेलने तायक्वांदो कराटे प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली आहे.


या स्पर्धेत देशातील विविध राज्यातून अनेक नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये शमवेलने आपले तंत्र, शिस्तबद्ध सराव आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्ण पदक पटकावले. तसेच आणखी एका गटात रौप्य पदक मिळवून त्याने आपल्या यशात भर घातली. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयासह अहिल्यानगर शहराचा नावलौकिक वाढला आहे.


या यशाबद्दल शाळेच्या वतीने शमवेल वैरागर याचा संस्थेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्‍वस्त शंकर सामलेटी, शंकर येमूल, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शमवेलचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *