क्रीडांगणात जोश आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन
खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असा सर्वांगिण विकास होतो -बाबासाहेब बोडखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागापूर एमआयडीसी येथील रामराव चव्हाण विद्यालयामध्ये हिवाळी क्रीडा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या क्रीडा महोत्सवात विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित क्रीडांगणात जोश आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
हिवाळी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब बोडखे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोडखे म्हणाले की, “खेळामुळे विद्यार्थी तंदुरुस्त राहतो. जितके भौतिक श्रम महत्त्वाचे आहेत, तितकेच शारीरिक श्रमही आवश्यक आहेत. नियमित खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असा सर्वांगिण विकास होतो. तसेच खेळातून सांघिक भावना, संघटन कौशल्य, शिस्त व एकात्मता हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव घाडगे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हा व विभागीय पातळीवर मिळवलेल्या यशाची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, क्रिकेट यांसह थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी तसेच विविध वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा. दीपक कळसे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बोबडे, क्रीडा शिक्षक सोनवणे, तसेच रामराव चव्हाण विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा महोत्सव पाहण्यासाठी परिसरातील पालकांनीही गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू नरोडे यांनी केले, तर पर्यवेक्षक दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
