• Tue. Dec 30th, 2025

पिंपळगाव माळवी परिसरात खाजगी जमिनीतून मुरुमाची चोरी :

ByMirror

Dec 8, 2025

अवैध उत्खननाविरोधात शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार


रात्री-अपरात्री मुरुम चोरी; शेतात मोठमोठे पडले खड्डे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे खाजगी मालकीच्या सर्वे क्र. 154 मधून गौण खनिज (मुरुम) चे मोठ्या प्रमाणात अनधिकृत आणि बेसुमार उत्खनन करून चोरी केली जात असल्याची गंभीर तक्रार जागामालक बाबासाहेब रामभाऊ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.


बाबासाहेब शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या सर्वे नं. 154 या खाजगी जमिनीतून काही अज्ञात व्यक्ती रात्री-अपरात्री येऊन मुरुमाचे उत्खनन करतात व ट्रक-ट्रॅक्टरने चोरी करून नेतात. या प्रकारामुळे शेतजमिनीचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून उत्खननामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे शेती करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
अनधिकृत मुरुम उत्खननामुळे शेताची नैसर्गिक सपाटी बिघडली, जमिनीची उत्पादकता घटली आहे. या अवैध उत्खननामुळे महसूल विभागाला व राज्य शासनाला आर्थिक तोटा होत आहे. खाजगी हक्कांचा भंग करुन खाजगी शेत जमीनीत सुरु असलेल्या या प्रकरामुळे मोठी हानी झाल्याचे शिंदे यांनी निवेदनात म्हंटले आहे.


या गंभीर प्रकरणात शिंदे यांनी संबंधित विभाग (महसूल, तहसील, भूगर्भशास्त्र व खनिकर्म विभाग) मार्फत स्थळ पंचनामा करण्यात यावा, अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, भविष्यात हा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, शेतजमिनीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *