विशेष शिक्षक उमेश शिंदे व रामेश्वर ढगे यांच्या संकल्पनेतून ‘स्वाध्याय पुस्तिका’ची निर्मिती
दिव्यांग विद्यार्थ्यांना चालना देण्याचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका शिक्षण विभागाच्या रिमांड होम केंद्रामध्ये वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत होम-बेस तसेच तीव्र स्वरूपातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखन व वाचनपूर्व कौशल्य विकसित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण बौद्धिक आणि शैक्षणिक विकास साधणे असा आहे.
लेखनवाचन ही दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केंद्रातील विशेष शिक्षक उमेश शिंदे व रामेश्वर ढगे यांच्या संकल्पनेतून ‘स्वाध्याय पुस्तिका’ची निर्मिती करण्यात आली. या पुस्तिकेचे प्रकाशन प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. केंद्रातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने तयार केला जातो. विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार अध्यापन पद्धतीत बदल करून कौशल्यविकास साधता येतो, यासाठी या पुस्तिकेची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
विशेष शिक्षक उमेश शिंदे यांनी तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकेत ट्रेसिंग, ओळख, आकार, रंग व अक्षर सराव यांचा समावेश आहे. तर रामेश्वर ढगे यांनी विद्यार्थ्यांच्या वाचा उपचार (स्पीच थेरपी) लक्षात घेऊन मराठी स्वरोंचे उच्चार, मुखक्रिया व ओळख सराव काळजीपूर्वक मांडले आहेत.
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की, हा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ट्रेसिंग पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या हाताला गती (हॅण्ड ग्रीप) मिळेल आणि लेखनकौशल्य सुधारेल. रंगीत चित्रांच्या वापरामुळे शिक्षण सोपे व आकर्षक बनले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी स्वर, व्यंजन ओळख, लेखनवाचनपूर्व कौशल्याचा सराव आणि शैक्षणिक उद्दिष्टे यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत निश्चितच वाढ होणार असल्याचे सांगितले. मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी स्वाध्याय पुस्तिका अभ्यासक्रमातील सातत्य टिकवते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी अशा पुस्तिकांचा मोठा उपयोग होणार असल्याची भावना व्यक्त केली.
महानगरपालिका रिमांड होम केंद्रात राबविण्यात आलेला हा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, अक्षरओळख, उच्चार, वाचनपूर्व कौशल्य आणि मूलभूत लेखनकौशल्य प्राप्त करण्यास मोठी मदत करणार आहे. शिक्षकांनी कल्पकतेने तयार केलेली स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
