• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अपघात टाळण्यासाठी अखेर आनंदधाम ते अहिंसा चौक दरम्यान बसविण्यात आले गतीरोधक

ByMirror

Nov 29, 2025
माजी नगरसेवक अविनाश घुले यांचा पुढाकार; नागरिकांच्या वतीने सत्कार

माजी नगरसेवक अविनाश घुले यांचा पुढाकार; नागरिकांच्या वतीने सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदधाम परिसर ते अहिंसा चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाली होती. पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला असताना माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी पुढाकार घेत रस्त्यावर गतीरोधक बसवून देण्याचा प्रश्‍न मार्गी लावला. या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न सोडविल्याबद्दल स्थानिकांनी घुले यांचा सत्कार केला.


या प्रसंगी अमोल पोखरणा, संजय कटारिया, दिलीप बोरा, पंकज गांधी, रितेश चोपडा, संचिन डुंगरवाल, सिद्धेश फुलसौंदर, प्रशांत फुलसौंदर, दिलीप कटारिया, प्रकाश गुंदेचा, निलेश मेहेर, संजय भंडारी, जितू पोरवाल, रितेश कोठारी, दिप पोखरणा आदी नागरिक उपस्थित होते.


आनंदधाम परिसर ते अहिंसा चौक रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण झाल्याने त्यावरून वाहने प्रचंड वेगाने धावत होती. आनंदधाम आणि उज्वल नगर येथे जैन समाजाची दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. येथे साधू-साध्वी दररोज सकाळ-संध्याकाळ पायी मार्गक्रमण करतात. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या साधू-साध्वींबरोबरच रोज फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनाही वाढत्या अपघातांचा धोका निर्माण झाला होता. रस्ता ओलांडणे तर अनेकांसाठी धोकादायक बनले होते.


गेल्या काही महिन्यांत झालेल्या अपघातांत अनेक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून काहींना वेगाने येणाऱ्या वाहनांनी उडवल्याच्या घटना घडल्या. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांकडून या रस्त्यावर तातडीने गतीरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी पाठपुरावा करुन रस्त्यावर गती रोधक बसवून दिले. नागरिकांच्या प्रश्‍नाची दखल घेतल्याबद्दल नागरिकांच्या वतीने घुले यांचे आभार मानण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *