• Thu. Jan 22nd, 2026

प्रभाग 17 मधील बंद पडलेले पथदिवे सुरु करण्याची मागणी

ByMirror

Nov 23, 2025

नागरिकांची मनपाकडे धाव; आयुक्तांना निवेदन


बंद पथदिव्यांमुळे अपघात-चोरी वाढल्या; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद पडल्यामुळे नागरिकांना अक्षरशः अंधारात प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.


या वेळी वैभव पाचारणे यांनी नागरिकांच्या समस्या आयुक्तांसमोर मांडत प्रभागातील अंधारामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले. याप्रसंगी विनोद कांबळे, नामदेव कोतकर, गणेश शिंदे, अजित कोतकर, भाग्यश्री पाचारणे आदी नागरिक उपस्थित होते.


निवेदनात म्हंटले आहे की, प्रभागातील काबळे मळा, दुधसागर, लोंढे मळा, रेल्वे स्टेशन परिसर, इंदिरा नगर, हनुमान नगर या संपूर्ण भागातील नगरपालिका पथदिवे बंद आहेत. त्यामुळे संध्याकाळी पाचनंतर रस्त्यावर अंधार पसरतो आणि गाड्या तसेच पादचारी यांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने लहान-मोठे अपघात वाढत आहेत. हिवाळा सुरू झाल्यामुळे दिवस लवकर मावळतो. अंधार लवकर पडत असल्याने रस्त्यावर चालणे धोकादायक झाले आहे. सतत अंधार असल्याचा फायदा गुन्हेगार घेत असून परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याचे रहिवाशांनी निवेदनात नमूद केले आहे.


घरफोड्या, वाहनचोरी, रस्त्यावर लुटमार यांसारखे प्रकार वाढू लागले असून नागरिक विशेषतः महिलांना रात्री बाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर येत आहे. अंधारामुळे हा धोका अधिक गंभीर बनला असून, नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रभाग 17 मधील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे पथदिवे तातडीने चालू करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *