व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी आणि ‘कमवा व शिका’ या उपक्रमाला चालना
विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पकतेतून लाखोंची उलाढाल
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून वैद्यकीय मदतही उभी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 21 नोव्हेंबर) फूड फेस्टिवल उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी आणि ‘कमवा व शिका’ या उपक्रमाला चालना मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश होता. महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. या फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या विक्रीमुळे लाखोंची उलाढाल झाली.
फूड फेस्टिवलचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा .कल्पना दारकुंडे, पर्यवेक्षक प्रा .सुभाष गोरे, तसेच प्रा. प्राजक्ता भंडारी, प्रा. राजेंद्र जाधव, प्रा. कल्याण मुरकुटे, प्रा. नितीन पानसरे, प्रा. किरण वाघमोडे, प्रा. प्रमिला तांबे, प्रा. चंद्रकांत फसले, प्रा. डिके रंजना आदी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे म्हणाले की, आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना स्वतःमधील गुणांचे आत्मपरीक्षण करता येते. प्रत्येकाकडे नवनवीन कल्पना असतात; त्या कल्पना व्यवसायात उतरवल्यास जीवनात यशस्वी मार्ग सापडू शकतो. तसेच, प्राध्यापक व विद्यार्थी संकट काळात एकमेकांच्या मदतीला धावून जातात ही महाविद्यालयाची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.
फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या पदार्थांचे स्टॉल, ज्यूस, केक, कुल्फी, स्नॅक्स, भेळ , इडली , चहा तसेच जीवनोपयोगी वस्तूंचे स्टॉल उभारले होते. पाणीपुरी, भेळ, समोसे, इडलीसांबर, पापड भाजी, वडापाव, गोडधोड पदार्थ अशा विविध खाद्यपदार्थांना मोठी मागणी होती. विद्यार्थ्यांनी केलेली पदार्थांची नावीन्यपूर्ण मांडणी, विक्री कौशल्य आणि व्यवहार हाताळण्याची पद्धत पाहून प्राध्यापकांनी त्यांचे कौतुक केले.
पाहुण्यांचे स्वागत कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा .कल्पना दारकुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे यांनी मानले. फूड फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक वृंदांनी परिश्रम घेतले.
न्यू आर्ट्स कॉलेजची सामाजिक बांधिलकी; गरजू विद्यार्थ्यासाठी 58 हजारांची वैद्यकीय मदत.
महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संकट काळात महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आधार दिला. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत गोळा करून विद्यार्थ्याचे वडील अशोक खाडे यांना 58 हजार रुपयाची मदत सुपूर्द केली. यामध्ये प्रा. प्राजक्ता भंडारी यांनी वैयक्तिक 10 हजार रुपये देऊन विशेष योगदान दिले. यापूर्वीही अतिवृष्टी मधील पूरग्रस्तांसाठी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मदत उभी करून सामाजिक कर्तव्य जपले होते.
