अत्याचार मुक्त अभियानाचे प्रारंभ
आकाशात तीरंगे फुगे सोडून, पंडित जवाहरलाल नेहरुंना अभिवादन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी लहान मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाल अत्याचार मुक्त अभियानाचे प्रारंभ करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय कदम, पोलीस उपाधीक्षक दिलीप टीपरसे, भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचे अध्यक्ष रेहान काझी, उडान प्रकल्पाच्या मानद सचिव ॲड. बागेश्री जरंडीकर, स्नेहालयाचे संचालक हनीफ शेख, चाईल्ड लाईनचे महेश सूर्यवंशी, डॉ. अंशु मुळे, मुन्नवर हुसेन, वाजिद खान, तन्वीर खान आदींसह बालभवन प्रकल्प व अहमदनगर उर्दू स्कूल व एम्स इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. परिसरात तिरंगे ध्वज, रांगोळी व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय…., देश की ताकत हम सब बच्चे…, जोडो जोडो भारत जोडो… च्या घोषणा देत पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे व पांढरे कबुतरे सोडण्यात आली. तर जिल्हा बाल अत्याचार मुक्त करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
प्रास्ताविकात हनीफ शेख म्हणाले की, बालकांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी व बालकांच्या हक्कांची जपणूक करण्याचे कार्य उडान प्रकल्प करीत आहे. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे बाल अत्याचार मुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी प्रशासनाचे व संवेदनशील अधिकाऱ्यांचे विशेष योगदान मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, बालपण हे जीवनातील सोनेरी क्षण असतात. जीवनात मागे पाहताना बालपण आठवते. मात्र सध्या बालपणातच विवाह होत असल्याने त्याचे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. बालविवाह मुक्त जिल्हा होण्यासाठी 1327 गावांच्या ग्रामसभेत या विषयावर जागृती करण्यात आली. तसेच बाल अत्याचार मुक्त जिल्हा होण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे. बालकांवरती होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुलांसह पालकांमध्ये जागृती आवश्यक आहे. मुलांना स्वसंरक्षणाचे धडे दिल्यास ते आपले संरक्षण अधिक चांगल्या पध्दतीने करु शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांनी विश्वास संपादन केलेले जवळचे व्यक्तीनी बालकांवर अत्याचार केल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. यासाठी मुलांना चांगला व वाईट स्पर्श याची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. अंशु मुळे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान देताना आपल्या शहराशी आलेला संबंध विशद केला. संजय कदम व मुन्नवर हुसेन यांनी बालदिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पासपुल यांनी केले. आभार ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहालय, बालभव व उडान प्रकल्पाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
