• Fri. Nov 14th, 2025

गणिताचे ‘भीष्म पितामह’ आणि दोन विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. निमसे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

ByMirror

Nov 14, 2025

शिक्षण क्षेत्राला उंची देणारे डॉ. सर्जेराव निमसे – ना. शरद पवार

देशभरातील 20 आजी-माजी कुलगुरुंनी लावली उपस्थिती


प्रा. गणेश भगत संपादित “कुलगुरू” व “शिक्षण आणि विकास” या ग्रंथांचे प्रकाशन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिशा देण्याचे काम केले. गणित या अवघड विषयात योगदान दिले. पुणे विद्यापीठाची जबाबदारी सांभाळताना उत्तमपणे काम केले. नांदेड येथे कुलगुरू असताना त्यांनी उत्तमपणे जबाबदारी पार पडली. नामविस्तारावरून वाद झालेला असताना त्यांनी सर्वांशी समन्वय साधून यशस्वी मार्ग काढला. शिक्षण क्षेत्रातून त्यांनी समाजाची सेवा केली. समावेशक, दूरदृष्टी असलेल्या अशा व्यक्तिमत्त्वाची समाजाला गरज गरज असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांनी केले.


कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती, गणित विभाग माजी विद्यार्थी संघ व न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी (दि.14 नोव्हेंबर) शिक्षण क्षेत्रात 44 वर्ष प्रदीर्घ योगदान देणारे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. शरद पवार बोलत होते. रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. के. ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी खासदार निलेश लंके, पद्मश्री पोपट पवार, डॉ. जब्बार बगदाद (इराक), ॲड. विश्‍वासराव आठरे, माजी कुलगुरु डॉ. अशोक कोळकर, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ.एस.एन. पठाण, डॉ. वासुदेव गाडे, डॉ. उध्दव भोसले, कुलगुरु डॉ. जयंत वैशंपायन, डॉ. अरविंद दीक्षित, डॉ. उपेंद्र द्विवेदी, डॉ. मनोहर चासकर, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कॅनडा येथील डॉ. निंगराज, इराक येथील डॉ जब्बार.ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, उद्योजक अरविंद पारगावकर, पराग काळकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, ॲड. विद्याधर काकडे, रावसाहेब वर्पे, डॉ विवेक भापकर , जयंतराव वाघ, मुकेश मुळे आदींसह आजी-माजी कुलगुरु, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षणतज्ञ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले की, हा निमसे यांच्या वाढदिवसाचा नव्हे तर चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव सोहळा आहे. निमसे हे सामाजिक जाणिवांचे, शिस्तप्रिय आणि अडचणींच्या काळातही विद्यापीठांना सक्षमपणे दिशा देणारे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


या सोहळ्यात डॉ. सर्जेराव निमसे यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा प्रा. गणेश भगत संपादित “कुलगुरू” गौरव ग्रंथ तसेच डॉ. सर्जेराव निमसे व प्रा. गणेश भगत संपादित शैक्षणिक ग्रंथ “शिक्षण आणि विकास” या दोन ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. शरद पवार यांच्या हस्ते माजी कुलगुरु यांचा सपत्निक गौरव करण्यात आला. गौरव मानपत्राचे वाचन प्रा. गणेश भगत यांनी केले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व यशवंतराव चव्हाण व्यासपीठच्या वतीने देखील त्यांना सन्मान करण्यात आला. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली. या सोहळ्यास देशभरातील आजी-माजी 20 कुलगुरुंची उपस्थिती होती.


माजी कुलगुरू निमसे यांचे पुतणे न्यायधीश श्रीकांत निमसे यांनी कौटुंबिक जीवनातील त्यांचे योगदान स्पष्ट केले. निमसे परिवाराच्या वतीने नांदेड विद्यापीठाला गणित विभागासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे व त्याद्वारे प्रा. निमसे यांच्या नावाने गोल्ड मेडल देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांचा शुभेच्छा संदेश व्हिडिओद्वारे दाखवण्यात आला.


माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी माजी कुलगुरु यांच्याबद्दल भावना विशद केल्या. डॉ. जब्बार बगदाद यांनी निमसे यांच्या मित्रत्वाचे व शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव विशद केले. डॉ. जयवंत वैशंपायन यांनी कुलगुरू असताना कसे काम करावे? हे निमसे यांनी त्यांच्या कार्यातून दाखवल्याचे सांगितले. भारतकुमार आहुजा यांनी तपस्वी गुरू असलेले निमसे हे गणित विषयाचे भीष्म पितामह असल्याचे स्पष्ट केले.


डॉ. वासुदेव गाडे म्हणाले की, माजी कुलगुरु निमसे यांनी पुणे विद्यापीठ सायन्स विभागाचा विकास केला. विज्ञान विभागाला त्यांनी न्याय देण्याचे काम केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा शैक्षणिक संस्थांना होणार असल्याचे सांगितले. डॉ. माणिकराव साळुंके यांनी कुलगुरू असताना व्याख्यान घेणारे ते एकमेव कुलगुरु होते. कोरोनानंतर शिक्षणाची परिस्थिती वाईट झाली असून, यासाठी त्यांचा अनुभव इतर विद्यापीठांना मार्गदर्शक ठरेल. डॉ. अरविंद दीक्षित यांनी हा कुलगुरुंचे संमेलन भरल्याचा अनुभव सांगितला.


ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील यांनी माजी कुलगुरु निमसे यांच्यामुळे जिल्ह्याचे नाव भारतभर गेला. त्यांच्या कार्यकाळात न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाने प्रगती साधल्याचे सांगितले. डॉ. मनोज दीक्षित यांनी निमसे यांच्या मार्गदर्शनाने कुलगुरूंची संधी मिळाल्याचे कबुल केले.


सत्काराला उत्तर देताना माजी कुलगुरु सर्जेराव निमसे म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा गौरव सोहळा साजरा होत आहे. शैक्षणिक कौटुंबिक जीवनाच्या वाटचालीवर त्यांनी प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत 33 वर्षे काम करताना स्वत:चा सर्वांगीन विकास झाला. ही संस्था आयुष्यातील प्रयोगशाळा ठरली. कुलगुरु म्हणून काम करताना हा अनुभवाची शिदोरी महत्त्वाची ठरली. नांदेडला कुलगुरू असताना शैक्षणिक उपक्रम राबवून साडेचारशे असलेले विद्यार्थी संख्या 3000 पर्यंत नेली. लखनऊ विद्यापीठाला शिस्त लावली. 1890 नंतर पहिल्यांदा 25 कोटीची इमारत सीएसआर फंडातून उभारली. या कार्यातून समाधान मिळाले. न थांबता गणिती संदर्भात संशोधन व शैक्षणिक कार्य सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार मुकेश (दादा) मुळे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमृत महोत्सव गौरव समिती व माजी विद्यार्थी संघाने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *