भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार; सत्ताधाऱ्यांना जागवण्यासाठी प्रतीकात्मक पुरस्कार
असिम सरोदे यांची वकिलांची सनद रद्द , तर कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या पार्थ पवारांना स्टेनगनधारी पोलीसांचे संरक्षण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही भारतातील राज्यकर्ते चार हजार वर्षांपूर्वीच्या धृतराष्ट्र सम्राटाप्रमाणेच “आंधळ्या” वृत्तीने वागत असल्याची टीका करत भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाइन या संघटनांनी राज्याच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या संघटनांच्या पुढाकाराने “धृतराष्ट्र महाराज जागतिक पारितोषिक” या नावाने एक प्रतीकात्मक पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर करण्यात आला असल्याची असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या पारितोषिकाचे स्वरूप अत्यंत वेगळे असून “हा सूर्य, हे धृतराष्ट्र महाराज आणि हे प्रगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजीतजी पवार” या रूपात तो देशाच्या वतीने देण्यात येईल, अशी माहिती भारतीय जनसंसदचे अशोक सब्बन, वीर बहादुर प्रजापती आणि ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या मुलगा पार्थ पवार याच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहाराबाबत “मला काही माहिती नाही” असे जाहीरपणे सांगून स्वतःला अनभिज्ञ दाखवले. “घरातील गोष्टीच ज्यांना माहीत नाहीत, त्यांना जनतेच्या अडचणी आणि दुःखाची जाणीव कशी असणार?” असा सवाल करत संघटनांनी अजित पवार यांची तुलना महाभारतातील धृतराष्ट्राशी केली आहे.
संघटनांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की, तीन हजार कोटी रुपयांची किंमत असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांत मिळवण्यात आली, आणि ते ही एक रुपया न देता सरकारी तिजोरीला एकवीस कोटींचा तोटा देऊन. सदर जमीन ज्यांच्या ताब्यात गेली त्या कंपनीतील 99 टक्के शेअर्स पार्थ अजित पवार यांचे असल्याचे सांगण्यात आले. “रातोरात श्रीमंत होऊन एक नंबर मिळविण्यासाठीचा हा प्रयत्न असून, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून दिवसा ढवळ्या मोठा घोटाळा करण्यात आला,” असा आरोप संघटनांनी केला.
राज्याचे प्रसिध्द वकील असिम सरोदे यांनी दोन शब्द विरोधात बोलल्यामुळे त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली, तर कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या पार्थ पवारांना स्टेनगनधारी पोलीसांचे संरक्षण मिळते, हे स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
हजार रुपये व दीड हजार रुपयांची लालच दाखवून मागच्या दाराने सत्ता काबीज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी इंग्रजांनाही लाजवेल असा राजकारभार चालवला आहे,” अशी टीका संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अजित पवार यांना “साबर कांडयांचा हार” देशातील जनतेच्या वतीने प्रतीकात्मक स्वरूपात अर्पण करुन पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यासाठी संघटनेचे रईस शेख, बबलू खोसला, अशोक भोसले, अर्शद शेख, जसवंतसिंग परदेशी, पोपट साठे, अशोक डाके, सुनिल टाक, प्रकाश गोसावी आदी प्रयत्नशील आहेत.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….
