पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने पुढाकार
स्वच्छता हीच सेवा, वृक्षसंवर्धन हीच पूजा -नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमात शालेय परिसरातील साचलेला कचरा काढण्यात आला, झुडपे व गवत कापण्यात आले आणि झाडांना पाणी घालून त्यांचे संवर्धन करण्यात आले.
पै. नाना डोंगरे यांनी या उपक्रमाद्वारे स्वच्छ शाळा, सुंदर शाळा! हा संदेश दिला. दिवाळीच्या सुट्टीत स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करुन, तसेच पर्यावरणाविषयी जबाबदारी निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी हा उपक्रम राबवला. संस्थेच्या माध्यमातून मागील 25 वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाचे सातत्याने कार्य करण्यात येत आहे. या उपक्रमात लहानू जाधव आणि आनंद गेनाप्पा यांनी देखील सहकार्य केले.
शालेय परिसर स्वच्छ आणि हिरवागार ठेवण्याच्या त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करताना मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, नाना डोंगरे यांचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्यामुळे शाळा परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि हरित वातावरणात बदल होण्यासाठी मदत होत असल्याचे ते म्हणाले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण हे फक्त सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण शाळा, अंगण, गल्ली, गाव या सगळीकडे स्वच्छता आणि हरितता राखली, तरच भविष्यातील पिढीसाठी निरोगी वातावरण तयार होईल. एक झाड लावणे ही केवळ कृती नसून, ती समाजाप्रती आपली बांधिलकी असल्याचे ते म्हणाले.
डोंगरे यांचे संपूर्ण जिल्ह्यात डोंगरे संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सुरु असते. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाच्या मेरा युवा भारतच्या वतीने त्यांना स्वच्छता ही सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
