आजारी रुग्णांसोबत फराळ वाटून आनंद साजरा
प्रकाशाच्या या सणात, दुःखात असणाऱ्यांच्या जीवनात थोडा उजेड पसरवणे हीच खरी दिवाळी -भरत खाकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि एकत्रितपणाचा सण असला तरी काही लोकांना आजारपण, दुःख आणि परिस्थितीमुळे हा आनंद अनुभवता येत नाही. या भावनेला ओळखून आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांबरोबर माणुसकीची दिवाळी साजरी करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फराळ वाटप करण्यात आले.
भरत खाकाळ यांनी सांगितले की, शुभेच्छा देण्यासाठी आणि सुखात असलेल्या लोकांसोबत सण साजरा करण्यासाठी सर्वजण जातात; पण जे आजारी आहेत, दुःखात आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊन सण साजरा करणे ही खरी माणुसकी आहे. त्यामुळे आम्ही रुग्णालय
ात येऊन रुग्णांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांना थोडा आनंदाचा क्षण देण्यात आला. प्रकाशाच्या या सणात, दुःखात असणाऱ्यांच्या जीवनात थोडा उजेड पसरवणे हीच खरी दिवाळी, असल्याचा संदेश त्यांनी दिला.
या उपक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. फराळात चकली, लाडू, करंजी, शेव आदी पदार्थांचे वाटप करण्यात आले. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आम आदमी पार्टीच्या या माणुसकीच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आप जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्ष अँड. विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या सचिव कावेरी ताई भिंगारदिवे, युवा आघाडीचे उपाध्यक्ष पत्रकार विजय लोंढे, ओम संतोष भिंगारदिवे, सोहम संतोष भिंगारदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
रुग्णालयातील पाहणीदरम्यान आपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हा रुग्णालयात अद्याप एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याचे दिसून आले. भरत खाकाळ यांनी नमूद केले की, रुग्णांना खाजगी रुग्णालयांत महागड्या चाचण्या कराव्या लागतात. जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीनची सोय झाली पाहिजे. लवकरच या संदर्भात जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमातून आम आदमी पार्टीने समाजात संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश दिला.
