सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात भरीव योगदान
साहित्य आणि समाजकार्यातील नवा अध्याय
निमगाव वाघा (ता. अहिल्यानगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे हे गावातील तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक उपक्रमांमधून समाजहिताचे कार्य करत आहेत. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, पै. नाना डोंगरे व्यायामशाळा, नगर तालुका तालिम सेवा संघ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात चळवळ उभी केली आहे.
डोंगरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण, बीजरोपण आणि वृक्षसंवर्धनाचे विविध उपक्रम राबवून ग्रामीण समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण केली आहे. त्याचबरोबर काव्य संमेलनांच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन देत ग्रामीण भागात साहित्याची चळवळ उभी केली आहे.
वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले असून, मतदार जागृती, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, जलसंधारण मोहिम, रक्तदान शिबिरे आणि व्यसनमुक्ती उपक्रम या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक युवक समाजकार्यासाठी पुढे सरसावले आहेत.
पै. डोंगरे यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि तीन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करून नवोदित कवी व साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी समाजोपयोगी उपक्रमांनी साजऱ्या करण्याची त्यांची परंपरा आहे.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य देखील ते सातत्याने करतात. महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि महिला बचतगट मेळावे यांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाला दिशा दिली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध संस्थांकडून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले असून, त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श गोपालक पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. तसेच मतदार जागृतीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी त्यांचा गौरव देखील केलेला आहे. त्यांनी गावात राबविलेल्या स्वच्छता अभियानाची दखल घेऊन शासनाच्या वतीने स्वच्छता ही सेवा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, शिक्षण, संस्कार, साहित्य आणि पर्यावरण या चार स्तंभांवर आधारित समाजनिर्मितीचा दृढ संकल्प पै. नाना डोंगरे यांनी हाती घेतला आहे. त्यांच्या कार्यातून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा सच्चा अर्थ, साकार होत आहे.
