भक्ती, सेवा आणि संस्कारांची त्रिवेणी
समाजाचे ऋण हे केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीत उतरवणारे मोजकेच लोक असतात. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जन्मलेला हा अवलिया आज समाजासाठी एक दीपस्तंभ ठरला आहे.
*गरीबीच्या चटकेतून समाजासाठी झटणारा माणूस
नगर तालुक्यातील वाळकी या छोट्या खेड्यात अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले विजय भालसिंग यांनी बालपणातच हलाखीच्या परिस्थितीचे चटके सोसले. परंतु प्रतिकूल परिस्थितीला हरवून त्यांनी समाजाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. एस.टी. बँकेच्या नोकरीत असतानाही पोटाला चिमटा देऊन सामाजिक कार्यासाठी वेळ आणि पैसा वाहणारा हा माणूस, आज अनेकांच्या डोळ्यात श्रद्धा निर्माण करतो.
काही वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमास संगणक संच भेट देऊन भालसिंग यांनी शिक्षण आणि सेवाभाव यांचा अनोखा संगम घडवला.
अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांचे आयुष्य घडावे, या भावनेने त्यांनी ही देणगी दिली. शिक्षणालाही त्यांनी भक्तीची जोड दिली हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य.
*अनाथ आणि अपंग वधू-वरांना जीवनाचा नवा आधार
विजय भालसिंग हे अनाथ आणि अपंग वधू-वरांच्या लग्न सोहळ्यांमध्ये नेहमीच पुढाकार घेतात. अपघातग्रस्त आणि गरजू कुटुंबांना आर्थिक व मानसिक आधार देतात. वाळकी गावात बालकिर्तनकारांचा मेळावा घेऊन अनाथ मुलांना समाजाशी जोडले. एका वयोवृद्ध अनाथ व्यक्तीसाठी त्यांनी रोजचे जेवण आणि शेवटच्या क्षणापर्यंत सेवा दिली ही खरी माणुसकीची परिभाषा आहे.
*पर्यावरण संवर्धनासाठी निस्वार्थ धडपड
पर्यावरणाशी जिव्हाळ्याचे नाते ठेवत भालसिंग यांनी वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची सोय, कृत्रिम घरटी बसविणे अशा उपक्रमांतून जीवसृष्टीसाठीही माया दाखवली आहे. त्यांच्या घरट्यांमध्ये आज अनेक पक्षी वास्तव्यास आहेत माणुसकीसोबत निसर्गप्रेमाची ही दुर्मिळ जोड!
*धार्मिक व सांस्कृतिक संवर्धनाची अखंड धारा
गावातील पुरातन महादेव मंदिरात नंदीची मूर्ती स्वखर्चाने बनवून प्राणप्रतिष्ठा केली. बारवेचा गाळ काढून बारव पुनरुज्जीवित केली, महालक्ष्मी मातेची अखंड ज्योत सुरू ठेवली आणि मंदिराचे सौंदर्य वृद्धिंगत केले. स्वयंभू गौरीशंकर मंदिराच्या सभा मंडपाची रंगरंगोटी करून धार्मिकतेला नवसंजीवनी दिली.
*गावविकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
पूरामुळे वाहून गेलेल्या लेंडी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी, गावातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचा पाठपुरावा हे सर्व त्यांच्या कार्याचा अविभाज्य भाग आहे.
प्रशासनाकडे निवेदने देऊन, सातत्याने पाठपुरावा करून, त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
विजय भालसिंग यांचे कार्य केवळ मदत देणे नाही, तर संस्कारांचे बीज रोवणे आहे. ते म्हणतात सामाजिक कार्य ही माझी भक्ती आहे. समाज उभा राहिला, तर मी उभा राहीन. समाजासाठी जगण्याची प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व आज अनेक तरुणांसाठी आदर्श ठरत आहे. सामाजिक ऋण निस्वार्थ भावनेने फेडणारा हा अवलिया खऱ्या अर्थाने माणुसकीचा सच्चा उपासक आहे.
