48 रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया
फिनिक्समुळे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक अंध दिनाच्या पार्श्वभूमीवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी होवून मंगळवारी (दि.14 ऑक्टोबर) शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी स्वागत केले. या रुग्णांवर फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातंर्गत पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शहरातील जुने बस स्थान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. दर महिन्याच्या 10 तारखेला फिनिक्स सोशल फाउंडेशनकडून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाते. नुकत्याच झालेल्या शिबिरात पुणे येथील के. के. आय. बुधराणी हॉस्पिटलमध्ये 48 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया होवून परतलेल्या रुग्णांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
जागतिक अंध दिन सर्वत्र साजरा होत आहे. असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी या ब्रीद वाक्याप्रमाणे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. फिनिक्स सोशल फाउंडेशनने आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. पैशाअभावी कोणताही रुग्ण अंधत्वाच्या छायेत राहू नये, या हेतूने संस्थेने जिल्हाभर जनजागृती मोहीम राबवून शिबिर घेण्यात येत आहे.
गेल्या 33 वर्षापासून फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान चळवळ जिल्हाभर राबवली जाते. नेत्रदान चळवळीत समाजाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी केले.