जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या पाठपुराव्याने मिळाला शासकीय योजनेचा लाभ
शासनाच्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न -रावसाहेब काळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर येथे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या 38 कुटुंबांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सातत्यपूर्ण पाठपुराव्याने इमारत बांधकाम व अन्य कामगार कल्याण मंडळाच्या योजनेंतर्गत राबविण्यात आला. या उपक्रमामुळे बांधकाम कामगार कुटुंबीयांना दिवाळीपूर्वी आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला.
धडक जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या हस्ते सारसनगर येथे सुरु असलेल्या बांधकामस्थळी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद साळवे, बांधकाम व्यावसायिक योगेश वामन, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, संस्थेच्या मालनताई जाधव, दत्ता वामन, तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या महिला कुटुंबीयांची उपस्थिती होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उपक्रमामुळे अनेक कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
रावसाहेब काळे म्हणाले की, शासनाने कामगार आणि वंचित घटकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. परंतु त्या योजनांचा लाभ अनेकदा गरजूंपर्यंत पोहोचत नाही. जनकल्याण संस्थेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून हा लाभ प्रत्यक्ष कामगार कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आला, ही समाधानाची बाब आहे. वंचितांसाठी केलेले कार्य हे केवळ समाजसेवा नसून राष्ट्रनिर्मितीचे कार्य आहे. समाजातील सक्षम घटकांनी आपल्या परीने कष्टकरी वर्गाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले.
विनोद साळवे म्हणाले की, सेवा हाच धर्म, आणि समाजहित हाच आमचा मार्ग या विचाराने जनकल्याण बहुउद्देशीय संस्था काम करत आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगार हे आपल्या समाजाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. ते आपले घरे, इमारती, रस्ते बांधतात; परंतु स्वतःच्या कुटुंबासाठी आवश्यक सुविधा मिळविण्यात मात्र मागे राहतात. म्हणूनच शासनाच्या योजनांचा लाभ या कष्टकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. तसेच त्यांच्या आरोग्याबाबतही शिबिर घेऊन त्यांची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.