• Tue. Oct 14th, 2025

नवीन तंत्रज्ञानाच्या जोडीला पूर्वजांचे संस्कारही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे- पद्मश्री पोपटराव पवार

ByMirror

Sep 29, 2025

केडगाव येथील श्री अंबिका विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 जयंती साजरी


मिरवणुकीतून कर्मवीर अण्णांच्या विचारांचा जागर; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणातून कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजाला दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टी विचाराने समाजाची प्रगती झाली. त्यांचे स्वावलंबी शिक्षणाचे विचार आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.


केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अंबिका प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि विज्ञान विद्यालय, केडगाव येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, माजी सचिव शिवाजीराव भोर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, सल्लागार समिती सदस्य अंबादास गारुडकर, जनरल बॉडी सदस्य अशोक बाबर, जनरल बॉडी सदस्य अनिल साळुंके, विद्यालयाचे प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, महेश गुंड, रावसाहेब सातपुते, कृष्णाजी थोरात, प्रशांत कोतकर, रघुनाथ लोंढे, गोविंद कोतकर, गंगाधर लोंढे, पोपटशेठ शिंगवी, श्रावण चोभे, सुरेश थोरात, पुष्पा पठारे, अमृत महाराज शिंदे, अब्दुल सय्यद, पर्यवेक्षक अभय कुमार चव्हाण, उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूजा गोरे, वाळकी शाखेचे पर्यवेक्षक प्रदीप गारुडकर, मालुंजे शाखेचे पर्यवेक्षक कुशाभाऊ अकोलकर, बाबासाहेब जगदाळे, अशोक बडवे आदींसह स्थानिक स्कूल कमिटी सल्लागार समिती व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.


पद्मश्री पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांनी नेहमीच शालेय शिक्षकांचा अभिमान ठेवण्याचे आवाहन करुन आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. तर जीवनात यश मिळवण्यासाठी वेळेचे महत्त्व विशद केले.


प्रास्ताविकात प्राचार्य नवनाथ बोडखे म्हणाले की, दि.22 ते 23 सप्टेंबर दरम्यान शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या कला, क्रीडा स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कर्मवीर अण्णांच्या विचारांचा जागर विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आल्याचे ते म्हणाले.


अभिषेक कळमकर म्हणाले की, आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्थेचा मान रयत शिक्षण संस्थेला आहे. या संस्थेला 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही संस्था फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण भारतात शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरली आहे. कर्मवीर अण्णांनी या शाखा समाजातील शेवटच्या घटकांना शिक्षण मिळण्यासाठी सुरु केल्या. अण्णांचा हा विचार आजही तितकाच या संस्थेच्या माध्यमातून जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले.


पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त केडगाव मधून शालेय विद्यार्थ्यांनी अण्णांच्या विचारांचा जागर करण्यासाठी मिरवणूक काढली होती. लेझीम, झांज पथकाने समस्त केडगावकरांचे लक्ष वेधले. कर्मवीर अण्णाच्या प्रतिमेची अश्‍वरथ मिरवणूक व कर्मवीर अण्णांची वेशभूषा परिधान करुन आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणुकीतून अण्णांचा जयघोष करण्यात आला.


विद्यालयाचे उपशिक्षक रविकुमार तंटक हे रयत शिक्षण संस्थेतील 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता दहावी, बारावी मधील गुणवंत, इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


करण्यात आला. तसेच कला, क्रीडा स्पर्धेत जिल्हा व विभागीय पातळीवर यश मिळवल्या खेळाडूंचा देखील सन्मान करण्यात आला. अहवाल वाचन उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर यांनी केले.


बक्षीस वितरण कार्यक्रमाचे नियोजन अमोल डोईफोडे, संदीप गाडीलकर व सिताराम जपकर यांनी केले. तन्वी कुटेे या विद्यार्थिनीने कर्मवीर भाऊराव यांच्या जीवनावर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती औटी, पूजा गोरे, अश्‍विनी पवार, जयश्री भोस यांनी केले. आभार दत्तात्रय लांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिताराम जपकर, संदीप गाडीलकर, अजय कोळगे, सुधीर आघाव, अशोक आव्हाड, अंबादास पारधे, जयश्री बामदळे, स्वाती चोभे, अरुणा दरेकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *