• Tue. Oct 14th, 2025

अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत पुरस्कार वितरणाचा सोहळा उत्साहात

ByMirror

Sep 29, 2025

डिजीटल युगात एआयचे फायदे-तोटे जाणून घेणे बँकांसाठी आवश्‍यक -पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

संगमनेर मर्चंट बँक व भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचा बँकटेक पुरस्काराने गौरव


उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून गौतम नागरी सहकारी बँकेचा सन्मान; नगर मर्चंट बँक चे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांना जीवन गौरव पुरस्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डिजीटल युगात बँक क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना एआयचे फायदे व तोटे जाणून घेण्यासाठी बँकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. एआयने टेक्नॉलॉजीत मोठा बदल झालेला असताना सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी एआयचा कसा उपयोग करता येइल? या दृष्टीकोनाने विचारमंथन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.


अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशनची वार्षिक सभा व बँकाना पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे बोलत होते. जी.एस. महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील 18 बँकांचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले की, राष्ट्र निर्मितीसाठी बँका रक्तवाहिन्यांचे काम करतात. हे जिवंत राहणे समाजासाठी गरजेचे आहे. या बँकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी असोसिएशनची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. एकटी बँक काही जाचट नियम व अटी संदर्भात पाठपुरावा करु शकत नाही. मात्र बँकांचे संघटन असलेल्या असोसिएशनच्या माध्यमातून ते प्रश्‍न सोडविले जाऊ शकतात.


नियमाला फाटा देऊन कारभार केल्यास तेथून बँकांची चूक सुरु होते. एक चूक अनेक चुकांना जन्म देते. लांब पल्ल्यासाठी बँकांना सावकाश पुढे जावे लागणार आहे. कोणाच्या पुढे जाण्याची स्पर्धा न करता, स्वतःची स्पर्धा स्वतःशी करावी. विश्‍वास गमावला तर उभारलेली इमारत कोसळते. यासाठी विश्‍वास निर्माण करुन वाटचाल करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.


असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी वार्षिक अहवाल सादर केला. ते म्हणाले की, असोसिएशनच्या नफ्यात 55 टक्के वाढ झाली आहे. सध्या बँक कर्मचाऱ्यांकडून काही चूका झाल्यास संचालक मंडळाला त्या चूकांना तोंड द्यावे लागत आहे. संचालक मंडळ बँकेत नसतात, कर्मचाऱ्यांकडून काही चूका झाल्यास पोलिसांनी संचालक मंडळाला पूर्णत: जबाबदार न धरता सहकार्य करण्याचे ते म्हणाले.


गीतांजली शेळके म्हणाल्या की, जिल्ह्यात 18 संलग्न बँका असलेल्या असोसिएशनचे काम उत्तमपणे सुरु आहे. असोसिएशनच्या माध्यमातून समविचारी लोक जोडले जातात. सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक योगदान देत आहेत. तर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असोसिएशन कार्यरत आहे. सर्व बँका संघटनेच्या माध्यमातून एका व्यासपीठावर आल्यास विचारांची देवाण-घेवाण होवून प्रश्‍न सुटत असल्याचे ते म्हणाल्या.


या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बँक टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर केल्याबद्दल बँकटेक पुरस्कार संगमनेर मर्चंट बँक व भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँक यांना मिळाला. उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून पुरस्कार गौतम नागरी सहकारी बँक यांना देण्यात आला. प्रतिष्ठेचा असा जीवन गौरव पुरस्कार (बँक) नगर मर्चंट बँक चे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांना प्रदान करण्यात आला. तसेच बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांना पुरस्काराने जिल्हा पोलीस अधीक्षल घार्गे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आंचल डान्स ग्रुपच्या युवतींनी गणेश वंदना सादर केली. वार्षिक सभेचे विषयांचे वाचन करुन सर्व विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या सदस्य मेघाताई काळे व ॲड. अशोक शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत करुन आभार उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *