ज्येष्ठ औषध विक्रेते व औषध निर्माण अधिकाऱ्यांचा सत्कार
सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील -संजय गुगळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक औषधी विक्रेता दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील ज्येष्ठ औषध विक्रेते संजय गुगळे यांच्यासह मनपाचे औषध निर्माण अधिकारी व फार्मासिस्ट यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी डॉ. राजुरकर म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट योगदान देतात. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून औषध विक्रेते महत्त्वाची भूमिका बजावत असून, अनुभवाच्या जोरावर औषध विक्रेत्यांनी समाजात विश्वासहर्ता निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले.
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे विशेष समिती सदस्य व ज्येष्ठ औषध विक्रेते संजय गुगळे म्हणाले की, औषध विक्रेते हे नेहमीच सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी तत्पर असतात. डॉक्टर आणि फार्मासिस्ट हे एका नाण्याच्या दोन बाजू असून, समाजाच्या उत्तम आरोग्याचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचे कार्य परस्परांवर आधारलेले आहे.
डॉ. दिलीप बागुल यांनी कोरोना काळातील फार्मासिस्ट यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. आरोग्य क्षेत्रातील मोठा घटक म्हणून फार्मासिस्ट नागरिकांच्या सेवेत सतत योगदान देत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात भाऊसाहेब सुडके, विकास गीते, सचिन काळभोर, किरण खरात, जावेद रंगरेज, योगेश औटी, अजय लोळगे, सुमित जाधव, तुषार बेरड आदी औषध निर्माण अधिकारी व फार्मासिस्टांचा विशेष सत्कार करण्यात आला.