कडुनिंबाच्या झाडांची लागवड
मनुष्याच्या आरोग्यासाठी सर्वप्रथम पर्यावरणाचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक -सुनील सकट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचे औचित्य साधून भिंगार उपनगरातील शहापूर-केकती ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्र शासनाचा सामाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनील सकट यांच्या पुढाकाराने कडुनिंबाची झाडांची लागवड लावण्यात आली.
26 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे मानवी आरोग्य आणि पर्यावरण यांचा परस्परांशी असलेला संबंध अधोरेखित करणे. पर्यावरण प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड, पाण्याचे प्रदूषण, प्लास्टिक कचरा यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता, वृक्षारोपण, शाश्वत विकास या संकल्पनांना चालना देणे हा या दिनामागचा मूलभूत हेतू असून, या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानाप्रसंगी गणेश ढोबळे, कु. आरती सकट, युनूसभाई पठाण, निलेश दुरुळे, अरहान पठाण आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुनील सकट म्हणाले की, मनुष्याचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर सर्वप्रथम आपले पर्यावरण निरोगी ठेवावे लागेल. हवा, पाणी, माती या त्रिसूत्रीवर जीवन अवलंबून आहे. जर ही तिन्ही प्रदूषित झाली, तर मनुष्याचे आरोग्य कितीही प्रयत्न केले तरी सुरक्षित राहणार नाही. कडुनिंबाचे झाड लावण्याचा आजचा उपक्रम केवळ एक औपचारिकता नाही; कडुनिंब हे नैसर्गिक औषध आहे. गावोगावी असे झाड लावले गेले तर निसर्गाचा समतोल राखला जाईल. पर्यावरण वाचवणे म्हणजे आपले भविष्य वाचवणे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.