• Thu. Oct 16th, 2025

करंजीतील 16 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्य वाटप

ByMirror

Sep 22, 2025

घर घर लंगर सेवेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

पंजाबनंतर आता जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आधार देण्याचे कार्य सुरु; आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी लंगर सेवा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणाऱ्या गुरू अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा ने पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. अलीकडील पुरामुळे करंजी येथील 16 घरे पूर्णपणे वाहून गेली असून, कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी लंगर सेवेच्या वतीने स्वयंपाकघरातील साहित्य व भांडी वाटप करण्यात आले.


करंजी येथील उत्तरेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात हा मदत वाटप कार्यक्रम पार पडला. स्वयंपाकघरातील साहित्य, भांडी आणि अन्य आवश्‍यक वस्तू मिळाल्याने पूरग्रस्त कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या कार्यात हरजीतसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, प्रशांत मुनोत, सुनील थोरात, अनीश आहुजा, कैलाश नवलानी, सनी वधवा, करण धुप्पड, किशोर रंगलानी, मुन्नाशेठ जग्गी, राजू जग्गी, सोमनाथ चिंतामणी, अस्नूर धुप्पड या सेवादारांनी सक्रिय सहभाग घेतला.


या कार्यक्रमासाठी माजी सभापती मिर्झा मनियार, सरपंच रफिक शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य छगनराव क्षेत्रे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष अकोलकर, दत्तकृपा मेडिकलचे संचालक बाळासाहेब अकोलकर, डॉ. चंद्रशेखर अकोलकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गुरू अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानची घर घर लंगर सेवा नेहमीच आपत्तीच्या वेळी मदतीला धावून जाते. यापूर्वी कोल्हापूर, सांगली व शेवगाव भागातील पूरग्रस्तांना मदत पोहोचवली होती. नुकतेच पंजाबमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर तेथेही मदत पोहोचवण्यात आली. पंजाबसाठी आतापर्यंत 10,000 कपडे, ओडोमॉस व मच्छर अगरबत्त्या, दूध पावडर पाठविण्यात आले असून, लवकरच जनावरांचे खाद्य व औषधेही पाठविण्यात येणार आहेत.


गुरू अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानकडून अहिल्यानगर शहरात दररोज संध्याकाळी गरजूंसाठी मोफत अन्नसेवा (लंगर सेवा) सुरू आहे. पूरग्रस्तांसाठी मदतीचे कार्य अद्यापही सुरू असून, इच्छुक दाते व समाजातील बांधवांनी या सेवेत हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून अधिकाधिक कुटुंबांना तातडीची मदत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *