• Tue. Oct 14th, 2025

दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

ByMirror

Sep 22, 2025

अहिल्यानगर मधील पै. नाना डोंगरे, प्रकाश वाघ व धनेश्‍वर भोस यांचा होणार दिल्लीत गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने अहिल्यानगर मधील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना भगवान बुध्द राष्ट्रीय फेलोशिप सन्मान आणि प्रगतशील शेतकरी प्रकाश वाघ व माजी सैनिक धनेश्‍वर भोस यांना महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.पी. सुमनाक्षर यांनी नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली आहे.


नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. ग्रामीण भागात काव्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. तर वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावण्याचे कार्य ते करत आहे. विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना भगवान बुध्द राष्ट्रीय फेलोशिप सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


ढवळपूरी (ता. पारनेर) येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश वाघ हे नियोजनबद्ध पद्धतीने शेती करत असून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्यांनी शेतीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त पारंपरिक शेतीवर न थांबता, विविध पिके घेत त्यांनी शेतीचा नवा आदर्श घालून दिला आहे. शेतीसोबतच त्यांनी गोपालन क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करून शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.


तसेच श्रीगोंदा तालुक्यातील मौजे तांदळी दुमाला येथील माजी सैनिक धनेश्‍वर भोस यांनी कारगिल युद्धात सहभागी होवून शूरता दाखवली. यामध्ये त्यांना अपंगत्व आले. सैन्यातून निवृत्तीनंतर ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहे. गरजू घटकातील विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. या कार्याची दखल वाघ व भोस यांना महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. 12 व 13 डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या 41 व्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुरस्कार्थींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *