रायझिंग ट्रायबल फाउंडेशन व स्वाभिमानी शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांचा गौरव
शिक्षक हा समाजाचा पाया -रमाकांत काठमोरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील रायझिंग ट्रायबल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तब्बल 37 शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण आणि माजी नगरसेवक योगीराज गाडे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
प्रास्ताविकात शिंदे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य सतत सुरू आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवून त्यांचा सन्मान वाढविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रमाकांत काठमोरे म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा पाया आहे. समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करत असून, भावी पिढीच्या भवितव्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकाचे ध्येय असावे. असे त्यांनी सांगितले. तर शिक्षण क्षेत्रात सुरु असलेल्या शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले.
दिनकर टेमकर यांनी शिक्षक-विद्यार्थी यांचे नाते आजही कायम आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सन्मान दिला जातो. विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम ते करतात. अशैक्षणिक कामांच्या भारातही शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुबेर पठाण यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत फाउंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक केले.
योगीराज गाडे म्हणाले, शिक्षक अल्प वेतनातसुद्धा प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचा सन्मान होतोय ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मागे पालकांसह शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी डॉ.अर्शद सय्यद, शिक्षक नेते रवींद्र गावडे, बाळासाहेब वाकचौरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिक्षकांचे समाजातील महत्त्व विशद करुन गुणवंत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बंडू गाडेकर, राजेंद्र सोनवणे, अमोल क्षीरसागर, बाबासाहेब गवते, अंतोन मिसाळ, अनिता साठे, रिबिका क्षेत्रे, मुन्नवर खान, नियाज शेख, प्रमोद जाधव, महेंद्र तागड, देवराम दरेकर, प्रवीण साळवे, विजय साळवे, रवी चांदेकर, किशोर कार्ले आदींनी परिश्रम घेतले.