युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांचे उद्योग मंत्री सामंत यांना निवेदन
उद्योगपतींना धमक्या, मारहाण व खंडणी मागणीमुळे उद्योगधंदे धोक्यात -गलांडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसी परिसरात उद्योजकांना खंडणीसाठी त्रास देणे, धमक्या देणे व मारहाण करण्याच्या गंभीर घटनांमुळे औद्योगिक वातावरण गढूळ झाले असून अनेक छोटे-मोठे उद्योग शहराबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊन खंडणीधारकांविरोधात कठोर कारवाई करून उद्योजकांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, आमदार विठ्ठलराव लंघे, बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, संजय शेंडगे, संजीव भोर, माजी नगरसेवक गणेश कवडे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संदेश कार्ले, रामदास भोर आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आकाश दंडवते व त्याचे साथीदार अहमदनगर एमआयडीसी परिसरात उद्योजकांना त्रास देत आहेत. कच्चा माल नेणाऱ्या वाहनांना अडवून पैश्याची वसुली केली जात आहे. उद्योगपतींना थेट खंडणी मागितली जात असून नकार दिल्यास धमकावणे, मारहाण करणे, जबरदस्तीने पैसे उकळणे असे प्रकार घडत आहेत.
उद्योजकांनी वारंवार पोलिस अधीक्षक व एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या तरीही राजकीय दबावामुळे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट उद्योजकांसह उद्योजकांना संरक्षण देणाऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर लवकरच एमआयडीसीतील उद्योगधंदे बंद होऊन हजारो कामगार उपासमारीस सामोरे जातील, असा धोका व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योग मंत्री यांनी स्वतः पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना योग्य सूचना देऊन उद्योजकांना पोलिस संरक्षण द्यावे व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांनी केली आहे.