शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधव एकवटणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नंदीवाले आणि तिरमली समाजाला सातारा गॅझेटनुसार अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या गुरुवारी, दि. 18 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.
या बैठकीस छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत ठरविण्यात आले की, नंदीवाले आणि तिरमली हे समाज प्रत्यक्षात एकच असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाचे नियोजन नंदीवाले-तिरमली समाजाचे सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तसेच शहरातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन छावा संघटनेचे प्रदेश कार्यध्यक्ष रावसाहेब काळे आणि विनोद साळवे यांनी केले आहे.
रावसाहेब काळे म्हणाले की, नंदीवाले आणि तिरमली समाजाला सातारा गॅझेटनुसार आरक्षणाचा लाभ तातडीने देणे आवश्यक आहे. शासन दरबारी अनेक वेळा मागण्या केल्या तरीही याबाबत ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे समाजातील तरुणाई आणि पुढील पिढीच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने लढा उभारणे गरजेचे आहे. 18 सप्टेंबरचा मोर्चा हा केवळ हक्कासाठीचा संघर्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस समाजातील आणि संघटनेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये बाबुराव फुलमाळी, बाबू काकडे, सुरेश काकडे, गुलाब काकडे, उत्तम फुलमाळी, संजय फुलमाळी, भीमा औटी, राजू आव्हाड, श्रीधर शेलार, विलास काकडे यांचा समावेश होता.