अत्याधुनिक शेती व गोपालन क्षेत्रातील योगदानाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वाघवाडी ढवळपूरी (ता. नगर) येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश कृष्णा वाघ यांना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख व विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांच्या हस्ते वाघ यांना देण्यात आला. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र फंड, कार्यक्रम संयोजक ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, माळकुप सरपंच संजय काळे, कवी गीताराम नरवडे, आनंदा साळवे, भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश कृष्णा वाघ हे नियोजनबद्ध पद्धतीने शेती करत असून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्यांनी शेतीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त पारंपरिक शेतीवर न थांबता, विविध पिके घेत त्यांनी शेतीचा नवा आदर्श घालून दिला आहे.
शेतीसोबतच त्यांनी गोपालन क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करून गावकुसाबरोबरच तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या प्रगतशील व नावीन्यपूर्ण शेतीमधील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.