अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील कार्याची दखल
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात माजी शिक्षण संचालकांच्या हस्ते गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे प्रा. युनूस अकबर शेख यांना शिक्षण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान प्रा. शेख यांना समीरभाई फ्रेंड सर्कल व युथ आयकॉन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात झालेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर व आय.टी.आय.चे प्राचार्य खालीद जहागीरदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी अब्दुल कादीर सर, आरटीओ महेबुब सय्यद, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटच्या माजी प्राचार्या शाहिदा मॅडम, माजी शिक्षण विस्तार अधिकारी अलीम शेख, कार्यक्रम संयोजक समीर शेख, भूमिअभिलेख विभागाचे आरिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. युनूस अकबर शेख हे सध्या जामखेड येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी शिक्षणाला केवळ व्यवसाय न मानता एक सामाजिक ध्येय म्हणून स्वीकारले. त्यांच्या पुढाकाराने शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध विशेष उपक्रम राबविण्यात आले आहेत. वंचित व अल्पसंख्यांक घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष भर दिला आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी सोडवले आहे. या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.