ज्योतिष शास्त्रातील सेवाभावी कार्याची दखल
पुणे-जयपूर संमेलनात सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ज्योतिषी विजयकुमार कुलकर्णी यांना पुणे व जयपूर येथे झालेल्या ज्योतिष संमेलनात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्योतिष शास्त्राचा सातत्याने अभ्यास करत असलेल्या आणि शहरात सेवाभावाने ज्योतिष सेवा पुरवणाऱ्या कुलकर्णी यांचा हा गौरव ठरला आहे.
पुणे येथे दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात देशभरातील नामवंत ज्योतिषाचार्य सहभागी झाले होते. त्याचबरोबर जयपूर येथे इंटरनॅशनल ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर यांच्या वतीने आयोजित वेदामृत ॲस्ट्रो, वास्तू आणि तंत्र संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या दोन्ही संमेलनांमध्ये ज्योतिष क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या दोन महत्त्वपूर्ण संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत विजयकुमार कुलकर्णी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांचा ज्योतिष शास्त्रावरील अभ्यास, सेवा वृत्ती व समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांना विशेष सन्मान देण्यात आला.पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.