प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावर प्रश्न उपस्थित करुन चौकशी करुन कारवाईची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या सावेडी परिसरातील गट क्रमांक 245/2 ब संदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट आदेश दिल्याप्रकरणी गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणात खोटी नोटरी कागदपत्रे सादर करण्यात आली असून, त्याची सत्यता न पडताळता प्रांताधिकारी यांनी आदेश दिल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात तक्रारदार अल्ताफ शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित प्रांताधिकारी तसेच खोटी नोटरी तयार करणारे आणि ती सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
गट क्रमांक 245/2 ब संदर्भातील वादग्रस्त प्रकरणात प्रांताधिकाऱ्यांनी कोणतीही प्राथमिक चौकशी अथवा सादर केलेल्या कागदपत्रांची प्रामाणिकता पडताळून न पाहता थेट फेर क्रमांक 73107 चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा निष्काळजी आणि बेजबाबदार पद्धतीने दिलेल्या आदेशांमुळे खोट्या कागदपत्रांचा आधार घेणाऱ्या व्यक्तींना अनुचित संरक्षण मिळत आहे, तर खरे हक्कदार नागरिकांना अन्यायकारक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
प्रांताधिकारी पद हे जबाबदारीचे मानले जाते. या पदावरून न्यायनिष्ठ पारदर्शकता आणि कर्तव्यदक्षता अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात नोटरी कागदपत्रांची शहानिशा, रजिस्टर नोंदींची पडताळणी तसेच खोटी नोटरी सादर करणाऱ्यांची कसून चौकशी न करता आदेश पारित झाल्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा खरे हक्कदार नागरिकांना न्याय मिळणार नाही, अशी मागणी तक्रारदार अल्ताफ शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.