अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा, शहरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी
अण्णाभाऊ साठेंचा वारसा हा केवळ एका समाजाचे नाही, तर तो संपूर्ण मानवतेचा -प्रकाश थोरात
नगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती पीपल्स हेल्पलाईन आणि सकल मातंग समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची कार्यवाही त्वरीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, विजय पाचारणे, विजय वडागळे, भगवान जगताप, सिताराम सकट, उल्हास जगधने, रशीद शेख, प्रा. ना.म. साठे, राजू पठारे, विजय पवार यांच्यासह समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.
प्रकाश थोरात म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लोकनाट्य, यातील संघर्ष आणि वास्तव आजही अंत:करण हलवणारे आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक क्रांती केली, रशियासारख्या देशातही त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले. मग आपल्याच देशात त्यांना भारतरत्न सारखा सर्वोच्च सन्मान का दिला जात नाही? हे आमच्यासाठी चिंतनाचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज अण्णाभाऊ साठेंचा वारसा हा केवळ एका समाजाचे नाही, तर तो संपूर्ण मानवतेचा आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी नगर शहरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.