निरोगी आरोग्य व तणावमुक्तीच्या कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- योग-प्राणायामाचे धडे देणारे योगशिक्षक रामचंद्र बाबूराव लोखंडे यांना धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज योगरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात लोखंडे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी साहित्यिक गुंफाताई कोकाटे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, कवी संमेलनाच्या अध्यक्षा मनिषा गायकवाड, कवियत्री सरोज अल्हाट, संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कवी आनंदा साळवे, संभाजी नगर जिल्हा परिषदचे माजी सभापती मारुती साळवे, दिलावर शेख, साहेबराव बोडखे, भाऊसाहेब ठाणगे, विस्तार अधिकारी नलिनी भुजबळ, रामदास फुले आदी उपस्थित होते.
रामचंद्र लोखंडे ग्रामीण भागात योग, सुदर्शन क्रिया व ध्यानचे शिबिर घेत असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते प्रशिक्षक असून, तेव्यसनमुक्तीवर व्याख्यान देऊन युवकांमध्ये जागृती देखील निर्माण करण्याचे कार्य करत आहे. समाज निरोगी करण्याच्या उद्देशाने त्यांचे कार्य सुरु आहे. युवकांना तणावमुक्ती व उत्साहासाठी नकारात्मक भावनेतून मुक्ततेसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे. त्यांचे निरोगी आरोग्यासाठी सुरु असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राजर्षी शाहू महाराज योगरत्न पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
