सामाजिक न्याय दिनानिमित्त केडगावमधून मिरवणुक; शाहू महाराजांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
शाहू महाराजांचे विचार हे कृतीतून दिसावे -शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे
नगर (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे, केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या वतीने केडगाव ते शाहूनगर परिसरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शाहू महाराजांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. तर यामध्ये मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो…,सामाजिक न्यायदिनाचा विजय असो… या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण, मुले-मुली एकसमान दोघांनाही शिकवा छान, प्लॅस्टिकचा वापर टाळा पर्यावरणाची स्वच्छता राखा, स्वच्छता पाळा रोगराई टाळा आदी सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती केली.
राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्ताने शाळेच्या वतीने सर्व स्तरातील 110 गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक बबन साळवे राजेश सोनवणे व सखाराम गारुडकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्या अध्यक्षतेखाली हा जयंती सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. बुगे म्हणाले की, शाहू महाराजांचे विचार हे कृतीतून दिसले पाहिजे. मुलांपेक्षा मुली कमी नाहीत, असे वातावरण या शाळेमध्ये आहे. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम शाळेने केले आहे. शाहू महाराजांचे विचार आत्मसात करुन जीवनात मार्गक्रमण करा. शाळेतील वेगवेगळ्या शिष्यवृत्ती परीक्षेतूनच स्पर्धा परीक्षेचा पाया रचला जातो. यामध्ये सातत्य ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले की, दूरदृष्टी असलेला राजा म्हणजे शाहू महाराज होय. नगरमध्ये देखील त्यांनी आपल्या कार्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले. सर्व समाजाच्या उध्दारासाठी त्यांचे विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव बबन कोतकर, सहसचिव रावसाहेब सातपुते, खजिनदार प्रल्हाद साठे, संचालक दगडू साळवे, सुभाष बागले, जयद्रथ खाकाळ, भास्कर जासूद, महेश गुंड, अजित साबळे, जयश्री कोतकर तसेच जोशी हॉस्पिटलच्या संचालिका वैजयंती जोशी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेणुका म्हस्के, प्राचार्या वासंती धुमाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद साठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर सातपुते, भारती गुंड व जयश्री कोतकर यांनी केले. आभार प्राचार्या वासंती धुमाळ यांनी मानले.