विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
गुणवत्तेच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या शाळा नावरुपास येत आहे -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करुन समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गुलाबपुष्पांचे वाटप करण्यात आले.
रंगीबेरंगी रांगोळीने शाळेचा परिसर सजला होता. तर प्रत्येक वर्गात आकर्षक सजावट करण्यात आली होती. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका शारदाताई ढवण, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सरिता ढवण, सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ, अहिल्या सांगळे, योगिता वाघमारे आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, शहरालगत असलेली भिस्तबाग जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या जोरावर नावरुपास आली आहे. सर्वसामान्य वर्गातील मुले या शाळेत शिक्षण घेत असून, त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून शाळेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली असून, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांनी जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थीही आनंदाने शाळेत दाखल झाले. शाळेत बनविलेल्या सेल्फी पॉर्इंटवर विद्यार्थ्यांनी पालकांसह फोटो घेतले. विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांनी शाळा परिसर फुलला होता.