रिमझिम पावसात रंगला विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा
नगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक, माध्यमिक आणि बालक मंदिर विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पारंपरिक औक्षणाने स्वागत करण्यात आले. रिमझिम पावसाच्या सरींच्या साक्षीने सोमवारी (दि. 16 जून) सकाळी रंगलेल्या या स्वागत सोहळ्यात विद्यार्थ्यांमध्ये नव्या वर्षाची उमेद आणि उत्साह दिसून आला.
शाळेच्या प्रवेशद्वारावर फुग्यांनी सजलेली आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली होती. रंगीबेरंगी रांगोळीने शाळेचा परिसर सजवण्यात आला होता. प्रत्येक वर्गात फुगे लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे महिला शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले, तर सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चॉकलेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मशाली विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम आणि नगरसेवक मनोज दुलम यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राजेंद्र म्याना, शंकर सामलेटी, शंकर येमूल, श्रमिक जनता हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष विलास सग्गम, शाळा व्यवस्थापन समितीचे रमा श्रीनिवास भैरी, विद्या एक्कलदेवी, प्रियंका पासकंटी, विजया रायपेल्ली, मोनाली खंडागळे, निलिमा दुर्गम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे, शिक्षक प्रतिनिधी वैशाली वरुडे, सुचेता भावसार आदींसह शालेय शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिक्षकांनी शाळा सुरू होण्याआधीच श्रमिकनगर परिसरात गृहभेट उपक्रम राबविल्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती नोंदवण्यात आली. नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थीही आनंदाने शाळेत दाखल झाले. शाळेत बनविलेल्या सेल्फी पॉर्इंटवर विद्यार्थ्यांनी पालकांसह फोटो घेतले. विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांनी शाळा परिसर फुलला होता.
संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.