आवडत्या कार्टूनसह हस्तोंदोलन करुन विद्यार्थ्यांनी एकच धमाल; आकाशात फुगे सोडून जल्लोष
नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.16 जून) कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेत पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे आगमन झाले. विद्यार्थ्यांचे खास आकर्षण असलेले कार्टून त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात आवडत्या कार्टूनसह हस्तोंदोलन करुन विद्यार्थ्यांनी एकच धमाल आणि जल्लोष केला.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, अंबादास गारुडकर, श्यामराव व्यवहारे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुलांच्या उपस्थितीमध्ये पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. शाळेत एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी पहिला दिवस उत्साहात साजरा केला. प्रास्ताविकात मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देऊन शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांना सम्रग शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.