रामवाडीत ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ
रामवाडीच्या कायापालटामागे आमदार जगताप यांचे मोलाचे योगदान -प्रा. माणिक विधाते
नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेज लाईनचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कामामुळे रामवाडी परिसरातील नागरिकांना पावसाळ्यातील सांडपाणी वाहतुकीच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळणार असून, परिसराच्या स्वच्छतेस व आरोग्यास मोठा हातभार लागणार आहे. या कामासाठी रामवाडी नागरी सुविधा समितीच्या माध्यमातून समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे यांनी जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या उद्घाटनाप्रसंगी भूपेंद्र परदेशी, अनिता भोसले, रामवाडी नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, पप्पू पाटील, दीपक सरोदे, सतिश साळवे, सुरेश वैरागर, सचिन जाधव, सागर जाधव, आकाश मनोचा, रोहित मिश्रा, बाळूमामा माने, दीपक साबळे, दीपक लोखंडे, बंटी साबळे, पप्पू पाथरे, मयूर चखाले, गणेश ससाने, अजय केजरलं, राजू कांबळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, रामवाडी झोपडपट्टीसारख्या दुर्लक्षित भागात आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली आहेत. पथदिवे लावून अंधार दूर केला, रस्ते सुधारले, आता ड्रेनेज समस्या सोडवून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून दिल्या. हा खऱ्या लोकप्रतिनिधीचा विकासदृष्टीकोन असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश वाघमारे यांनी म्हणाले की, ड्रेनेज लाईनच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी थेट 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ते नेहमीच सामान्य, गरीब नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवतात. शहराच्या प्रत्येक भागात त्यांच्या पुढाकारातून विविध विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उद्घाटनप्रसंगी नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.