• Wed. Jul 2nd, 2025

शहरात पदाधिकारी मेळाव्यातून एकवटले शिवसैनिक

ByMirror

Jun 8, 2025

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकविण्याचा संकल्प; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांना सक्रीय होण्याचे आवाहन

पक्षाचे मिळालेले पद लोकांच्या उपयोगी आणावे -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात कमी, पण परफेक्ट काम करून दाखवतात. कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष देणारा व सर्वसामान्यांची प्रश्‍न सोडविणारा नेता पक्षाला लाभला आहे. पक्षासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे, पक्षाचे मिळालेले पद लोकांच्या उपयोगी आले पाहिजे, आठवड्यातून दोन दिवस पक्षासाठी देण्याचे आवाहन पर्यटन मंत्री तथा संपर्क नेते शंभूराज देसाई यांनी केले.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना पर्यटन मंत्री देसाई बोलत होते. सावेडी येथील माऊली सभागृहात झालेल्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, दिलीप सातपुते, कमलाकर कोते, नितीन औताडे, नगर तालुका प्रमुख अजित दळवी, रामदास भोर, मनोहर पोटे, नंदकुमार ताडे, सागर बेग, माजी महापौर शिलाताई शिंदे, सुरेखा कदम, रोहिणीताई शेंडगे, माजी नगरसेविका अश्‍विनी जाधव, संपर्क प्रमुख उज्वलाताई भोपळे, शोभाताई अकोलकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, संजय शेंडगे, सचिन शिंदे, आप्पा नळकांडे, संतोष ग्यानप्पा, परेश लोखंडे, दत्ता कावरे, युवा सेनेचे राज्य संघटक बाजीराव चव्हाण, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, दशरथ शिंदे, आशुतोष डहाळे, बापूसाहेब नेटके, कैलास माने, संदेश कार्ले, शरद झोडगे, दिलीप पवार, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, साईनाथ आधाट, महेश लोंढे, ओंकार शिंदे, अमोल होंबे, सुरेखा गव्हाणे आदी उपस्थित होते.


पुढे देसाई म्हणाले की, शिवसेनेत शिस्तबद्ध काम सुरु आहे. सक्रीय सदस्यांना संधी दिली जाणार आहे. निवडणुकांपूर्वी सर्व रिक्तपदे भरली जाणार आहे. कोट्याप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणी करावयाची असून, याचा तालुका निहाय आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


निवडणुकांना सामोरे जाताना महायुती रहावी व महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाव्या ही शिवसेनेची अपेक्षा आहे. तरी समन्वय समितीच्या अहवालानुसार निवडणुका कशाप्रकारे लढवायचे? हे तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केला. तर जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना विकास कामांसाठी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी सांगितले. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाला प्रतिसाद देत जनतेने एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले व मोठ्या मताधिक्यांनी विधानसभेच्या जागा निवडून दिल्या. घराघरात शिवसैनिक निर्माण करून, मनामनात शिवसेनेचे विचार रुजविण्याचे त्यांनी आवाहन केले.


आमदार अमोल खताळ यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. ते मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आल्याने, मतदार देखील शिवसेने मागे उभा राहण्यास तयार असल्याचे सांगितले.
आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की, एकनाथ शिंदे लोकाभिमुख कार्य करत आहे. त्यांनी केलेला कामाला प्रतिसाद देत रेकॉर्ड ब्रेक सत्ता जनतेने महायुतीला दिली. ते कष्टाने शिवसेना पुढे घेऊन जात असून, आगामी निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेत भगवा फडकणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन व दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पर्यटन मंत्री तथा संपर्क नेते शंभूराज देसाई यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना विविध पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली. तर त्यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, अतुल लोखंडे, वसंतराव खतारे, विनोद गायकवाड, माजी नगरसेवक दशरथ शिंदे आदींनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
पाहुण्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहरप्रमुख सचिन जाधव यांनी केले. प्रास्ताविक संभाजी कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. आभार दिलीप सातपुते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *