कार्यकर्त्यांची अनोखी श्रद्धांजली; जय हिंद फाऊंडेशनचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने वटवृक्षाची लागवड करून त्यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या समाजसेवेच्या आणि राजकीय कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जपण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
निर्मलनगर येथे घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक निखिल वारे, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते भीमराव आव्हाड, कोल्हारचे उपसरपंच गोरक्ष पालवे, जय हिंद फाउंडेशनचे मेजर शिवाजी पालवे, अनिल गर्जे, भाऊसाहेब देशमाने, बबनराव पालवे, संतोष शिंदे, बन्सी दारकुंडे, रघुनाथ औटी, दिलीप शेकडे, बळवंत पालवे, दिनकर गीते, अशोक गर्जे, मदन पालवे, ॲड. संदीप जावळे, रवी परदेशी, पोपट धीवर, संजय सानप, विठ्ठल खेडकर, भाऊसाहेब शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मेजर शिवाजी पालवे म्हणाले की, अरुणकाका हे जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणातील एक अढळ नेतृत्व होते. त्यांनी आयुष्यभर समाजकारण करत कार्यकर्त्यांना बळ दिलं. ते केवळ एक नेते नव्हते, तर समाजासाठी समर्पित असलेली मायेची सावली होते. त्यांच्या आठवणींप्रमाणे हा वटवृक्ष अनेक पिढ्यांना सावली देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
निखिल वारे, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, भीमराव आव्हाड यांनीही अरुणकाकांच्या नेतृत्वगुणांवर, संघर्षमय प्रवासावर आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी अरुणकाकांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केली.