शिक्षण हे पायाभूत ध्येय समोर ठेवून स्व. माधवराव मुळे याचे कार्य -डॉ. सदानंद मोरे
जी.डी. खानदेशे यांचा जीवन गौरवग्रंथ लवकरच प्रकाशित होणार
नगर (प्रतिनिधी)- शिक्षण हे पायाभूत ध्येय समोर ठेवून मराठा बोर्डिंगची स्थापना केली गेली. सत्यशोधक समाज चळवळीत वाढलेले माधवराव मुळे यांनी या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी बहुमोल योगदान दिले. त्यामुळे आज मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु असल्याची भावना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
स्व. माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवन गौरव पुरस्कार जी.डी. खानदेशे यांना प्रदान करण्यात आला. खानदेशे यांच्या वतीने त्यांचा मुलगा अभय खानदेशे यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी मोरे बोलत होते. लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश मुळे, उपाध्यक्ष दत्तापाटील नारळे, सचिव डॉ. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. लालचंद हराळ, डॉ. महेश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे डॉ. मोरे म्हणाले की, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतून बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. याच संस्थेतून अनेक आमदार, खासदार व विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व घडले आहेत. या संस्थेसाठी व शैक्षणिक चळवळीला गती देण्याचे काम करणाऱ्या जी.डी. खानदेशे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर सर्व पुरस्कार्थींचे कार्य डॉक्युमेंटेशनच्या रूपाने सर्व समाजासमोर आणण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. हा लेखी स्वरुपातील ठेवा सर्वांसाठी प्रेरक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले की, जी.डी. खानदेशे प्रसिद्धीपासून लांब राहिलेले व्यक्तिमत्व आहे. माधवराव मुळे यांनी शिक्षणसंस्थेचा पाया घातला, तर जी.डी. खानदेशे यांनी त्या पायावर कलश चढविला. शैक्षणिक संस्थेच्या प्रत्येक बांधकामात त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या सहकार्याने प्राचार्य असताना उत्तमपणे कार्य करता आल्याचे सांगून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रकाश झावरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्वागत दत्ता पाटील नारळे यांनी केले तर प्रास्ताविकात मुकेश मुळे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. प्रकाश झावरे यांनी स्व. माधवराव मुळे यांच्या जीवनाविषयी व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान विशद केले. प्रसिद्धीपासून लांब राहिलेले आणि समाजासाठी योगदान दिलेले जी.डी. खानदेशे यांच्या जीवनावर गौरव ग्रंथ लवकरच प्रकाशित केला जाणार असल्याचे यावेळी सर्वानुमते जाहीर करण्यात आले. अभय खानदेशी यांनी वडिलांच्या कार्याची दखल घेवून दिलेल्या पुरस्काराबद्दल खानदेशे परिवाराच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडली. यावेळी समाजाच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले. आभार सचिव प्राचार्य डॉ. एम.एम. तांबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश मुळे, नीलीम काळदाते, सुनील मस्के, बजरंग पाडळकर, संतोष आव्हाड, निलेश जासूद, दिनकर मुळे, संजय कोतकर व सर्व सभासद यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुळे (आबा) यांच्यावर प्रेम करणारे सर्व स्नेही व नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.