संविधान वाचन, मिरवणूक आणि उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली. विविध उपक्रमातून संपूर्ण गावात उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या जयंती सोहळ्याचे आयोजन निमगाव वाघा ग्रामपंचायत, नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, एकता फाउंडेशन, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि पंचशील युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नवनाथ विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मंदा साळवे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, अमोल वाबळे, तृप्ती वाघमारे, निकिता रासकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रशांत जाधव, लहानबा जाधव आदींचा समावेश होता.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कर्तृत्वातून समतेचे, शिक्षणाचे आणि सामाजिक न्यायाचे बीज रोवले. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा अभ्यास करून कृतीत उतरवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, शाळेमध्ये अशा कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्यांची आणि संविधानाच्या महत्त्वाची जाणीव निर्माण होते. फुले-आंबेडकरांचे विचार म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सरपंच लताबाई फलके, उपसरपंच किरण जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पंचशील युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी शंकर गायकवाड, संतोष कदम, राजू गायकवाड, दिपक आंग्रे, संग्राम केदार, अजय ठाणगे, पो.कॉ. खंडेराव शिंदे आदींसह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. संध्याकाळी गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आंबेडकरी समाजासह युवक, युवती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीने संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले.