समाजातील गरजूंसाठी फिनिक्सचे समर्पित कार्य -महंत संगमनाथ महाराज
महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- नेत्रदान व अवयवदान चळवळ गतीमान होण्यासाठी फिनिक्सचे योगदान सुरु आहे. महापुरुषांनी तत्कालीन सामाजिक प्रश्न व वंचित घटकांसाठी कार्य केले. त्यांचा आदर्श ठेऊन काळाची गरज बनलेल्या आरोग्य प्रश्नावर फिनिक्सचे कार्य दिशादर्शक असून, समाजातील गरजूंसाठी फिनिक्सचे समर्पित कार्य सुरु असल्याचे प्रतिपादन श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांनी केले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सप्ताहानिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी संगमनाथ महाराज बोलत होते. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिबिराला प्रारंभ करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, महात्मा फुले पतसंस्थेचे शरद झोडगे, उद्योजक अण्णा चौधरी, रतन तुपविहिरे, गणेश राऊत, लवेश गोंधळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
शरद झोडगे म्हणाले की, फिनिक्सच्या माध्यमातून अनेक दृष्टीहीन व्यक्तींना नवदृष्टी मिळाली आहे. अंधकारमय जीवन बनलेल्या सर्वसामान्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य फिनिक्स फाऊंडेशन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनने अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मरणोत्तर नेत्रदान झाल्यानेच अंधाचे जीवन प्रकाशमान होणार असल्याचे सांगून त्यांनी महापुरुषांच्या विचाराने फिनिक्सच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे सांगितले.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये 340 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. 78 रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटल मध्ये मोतीबिंदू, काचबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी शिबिरातील गरजूंना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, सागर खरपुडे, मंगेश दरवडे, सौरभ बोरुडे, अभी रासकर, राजेंद्र बोरुडे, ओम बोरुडे यांनी परिश्रम घेतले.